या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुका अध्यक्ष, शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील होते. त्यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले आणि वाचन अभियानाचे औपचारिक उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना मेहेत्रे मॅडम यांनी केले. अर्चना ढोकणे मॅडम यांनी कुसुमाग्रज यांची प्रसिद्ध ‘कणा’ कविता प्रभावीपणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नागटिळक सर यांनी नटसम्राट या साहित्यकृतीचा सारांश वाचन करून विद्यार्थ्यांना साहित्याची गोडी लावली. राहुरी पंचायत समितीच्या गटसाधन केंद्राचे विषयतज्ज्ञ संतोष गुलदगड सर यांनी ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ आणि ‘हिंद दी चादर’ या दोन्ही विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात सुरेशराव लांबे पाटील यांनी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, “वाचनामुळे विचारसरणी विकसित होते, ज्ञानाची कक्षा रुंदावते. मुलांबरोबरच पालकांनीही वाचनाची सवय लावली पाहिजे.” दररोज सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत मोबाईल, टीव्ही यांसारखी उपकरणे बंद ठेवून कुटुंबासमवेत वाचन करण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुरू केलेल्या ‘कुसुमाग्रज वाचन अभियान’ या स्तुत्य उपक्रमाबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांनी जाहीर आभार व्यक्त केले.
या कार्यक्रमास चेअरमन मच्छिंद्र लांबे, उपसरपंच शिवाजी लांबे, माजी उपसरपंच लहानुभाऊ तमनर, पंडित लांबे, राजेंद्र लांबे, आण्णासाहेब पटारे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पवार सर यांनी केले तर आभार प्रदर्शन शिवाजी कुलट सर यांनी केले.

0 टिप्पण्या