श्रीरामपूर दूध संघ, बाभळेश्वर यांच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यास मोठ्या संख्येने पेन्शनधारक उपस्थित होते. यावेळी राहता प्रमुख दशरथ पवार, संगमनेरचे अशोक देशमुख, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष आशाताई शिंदे, राष्ट्रीय संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष संपत समिंदर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “गेल्या दहा वर्षांपासून राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली पेन्शनवाढीसाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे. अनेक आंदोलने, बैठका, खासदारांकडे पाठपुरावा करूनही केंद्र सरकारकडून केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही.”
या पार्श्वभूमीवर आता ‘करो या मरो’च्या निर्धाराने दिल्लीतील जंतर-मंतरवर भव्य आंदोलन छेडले जाणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त पेन्शनधारकांनी त्यात सहभागी व्हावे, तसेच रेल्वे आरक्षण तातडीने करून घ्यावे, असे आवाहन पोखरकर यांनी केले.
या मेळाव्याचे आयोजन नानासाहेब खर्डे, गोकुळ चिंतामणी, भाने, जगताप यांनी केले होते. कार्यक्रमास शिवाजी शितोळे, राठोड, इनामदार, कडू, लक्ष्मण हासे, अर्जुन जाधव, सुरेश कटारिया, रायभान तुपे, बी. आर. चेडे, केशव वर्पे आदींसह पेन्शनधारक उपस्थित होते. मेळाव्याचे प्रास्ताविक चिंतामणी यांनी केले तर आभार प्रदर्शन जगताप यांनी मानले.
पेन्शनवाढीच्या मागणीसाठी आता पेन्शनधारकांचा लढा निर्णायक वळणावर पोहोचला असून, दिल्लीतील आंदोलनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

0 टिप्पण्या