राहुरी कृषी विद्यापीठामार्फत निंबवडे येथे हॉर्टसॅप अंतर्गत डाळिंबावरील तेल्या रोगाबाबत मार्गदर्शन


राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन, पुणे यांच्या समन्वयातून राबविण्यात येणाऱ्या हॉर्टसॅप प्रकल्पांतर्गत २०२५-२६ या वर्षासाठी सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील निंबवडे गावात डाळिंब पिकावरील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव आर्थिक नुकसान पातळीपर्यंत पोहोचलेल्या क्षेत्रांसाठी विशेष मार्गदर्शन देण्यात आले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभागाने डाळिंबावरील तेल्या रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी तयार केलेली सविस्तर मार्गदर्शक पुस्तिका संबंधित तालुका कृषी अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी श्री. रविंद्र गुटकुडे यांना ऑनलाईन ई-मेल व व्हॉट्सॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात आली होती. या पुस्तिकांचे वितरण निंबवडे ग्रामपंचायत कार्यालयात तसेच तेल्या रोगाने बाधित शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात आले.

या प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांना डाळिंब तेल्या रोगाची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य कीड-रोग नियंत्रण पद्धती तसेच शाश्वत व्यवस्थापन याबाबत सखोल व शास्त्रीय मार्गदर्शन करण्यात आले. विद्यापीठाने सुचविलेल्या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना रोगाचे वेळेवर व अचूक नियंत्रण करण्यास मोठी मदत होणार असून उत्पादनातील संभाव्य नुकसान टाळता येणार आहे.

या उपक्रमासाठी प्रकल्प प्रमुख व विभाग प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड, प्रकल्प समन्वयक डॉ. संजय कोळसे तसेच संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे (हॉर्टसॅप प्रकल्प, वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) यांचे मोलाचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या