पिंपरी अवघड येथे १०० दिवसीय ‘बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत भव्य जनजागृती रॅली


राहुरी : तालुक्यातील पिंपरी अवघड या आदर्श गावात १०० दिवसीय बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत विपला फाऊंडेशनच्या वतीने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. बाल विवाहाविरोधात समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित या रॅलीला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या रॅलीत माजी सरपंच सुरेशराव लांबे, उपसरपंच शिवाजी लांबे, रायभान धसाळ, चांगदेव लांबे, काशिनाथ दोंड, बाळासाहेब लांबे, बादशाहा शेख, रावसाहेब गायकवाड, रमेश लांबे आदी मान्यवरांसह मुख्याध्यापक गंगाधर जवरे, शिक्षक अनिल पवार, शिवाजी कुलट, मच्छिंद्र नागटिळक, मेहेत्रे मॅडम, ढोकणे मॅडम, लांबे मॅडम, पुरी मॅडम व पिंपरी अवघड जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, पालकांसह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. “बालविवाह मुक्त करूया अहिल्यानगर जिल्हा सारा” व “लेक वाचवा, लेक शिकवा” अशा प्रभावी घोषणांनी संपूर्ण गाव दणाणून गेले. विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध व उत्साही सहभाग रॅलीचे विशेष आकर्षण ठरले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच, उपसरपंच तसेच राहुरी तालुक्यातील शिक्षण विभागाने मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे रॅली अत्यंत सुरळीत व प्रभावीपणे पार पडल्याबद्दल विपला फाऊंडेशनच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

रॅलीनंतर विपला फाऊंडेशनचे संदेश चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना बालहक्क व बालविवाह या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. बालविवाहाचे दुष्परिणाम, शिक्षणाचे महत्त्व तसेच कायदेशीर बाबी सोप्या व प्रभावी शब्दांत स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी बालविवाह प्रतिबंधाची प्रतिज्ञा घेतली.

हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव वाढवणारा ठरला असून, बालविवाहमुक्त समाज घडवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या