प्रशासन झोपेत, नागरिक देवाच्या दारात! नगर–शिर्डी महामार्गाचे ‘ग्रहण’ सुटावे म्हणून राहुरीत राहू–केतूला अभिषेक


राहुरी : नगर–शिर्डी महामार्गावरील रखडलेले काम, अपघातांची मालिका आणि प्रशासनाची बेफिकीर भूमिका यामुळे हैराण झालेल्या राहुरीकरांनी अखेर सरकारी दार सोडून देवाच्या दारात धाव घेतली. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर राहुरी येथील जगविख्यात राहू–केतू महाराजांच्या मंदिरात अभिषेक घालून महामार्गावरील ‘साडेसाती’ दूर करण्याची प्रार्थना करण्यात आली.

प्रशासनाच्या अनास्थेमुळे आणि ठेकेदारांच्या संथ कारभारामुळे त्रस्त व्यापारी असोसिएशन व नागरिकांनी केलेल्या या अनोख्या पण संतप्त आंदोलनाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राहुरी शहरातून जाणाऱ्या नगर–शिर्डी महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. मोठमोठे खड्डे, प्रचंड धूळ, अपूर्ण काम आणि नियोजनशून्य वाहतूक यामुळे हा महामार्ग अपघातांचा सापळा ठरत आहे. आतापर्यंत अनेकांना या रस्त्यावर प्राण गमवावे लागले असून, तरीही प्रशासनाकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही.

धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, तर महामार्गावरील वाहतूक थेट शहरी भागात वळवल्याने वाहतूक कोंडी आणि व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर नागरिकांनी अध्यात्मिक मार्गाने रोष व्यक्त केला. अभिषेकानंतर नागरिकांनी महामार्गाची रुंदी ३० मीटर करण्याची, रखडलेले काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आणि जीवघेणे अपघात थांबवण्यासाठी तांत्रिक त्रुटी तात्काळ दूर करण्याची ठाम मागणी केली आहे.

व्यापारी असोसिएशनचे प्रतिनिधी प्रकाश पारख यांनी सांगितले की, “आश्वासनांशिवाय काहीच मिळत नाही. रस्त्यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि व्यापाऱ्यांचे व्यवसाय दोन्ही उद्ध्वस्त झाले आहेत. प्रशासन झोपेत असल्याने आम्हाला अखेर देवाकडे साकडे घालावे लागले.” देवाच्या दारात मांडलेल्या या मागणीनंतर तरी प्रशासन जागे होणार का, की महामार्गावरील मृत्यूंची मालिका अशीच सुरू राहणार? हा प्रश्न आता जनतेच्या मनात ठाण मांडून बसला आहे.

याप्रसंगी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, रावसाहेब चाचा तनपुरे, राहुरी नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, उपाध्यक्ष गजानन सातभाई, प्रतीक तनपुरे, रस्ता दुरुस्ती कृती समितीचे देवेंद्र लांबे, नवनीत दरक, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पारक, नंदकुमार भट्टड, सूर्यकांत भुजाडी, अनिल कासार, विलास तरवडे, स्वप्निल कासार, विलास उदावंत, गणेश नेहे, संतोष आळंदे, बाळासाहेब उंडे, माधव बिडवे, प्रवीण ठोकळे, एकनाथ खेडेकर, लक्ष्मीकांत तनपुरे, संतोष लोढा, मोहन जोरी, प्रवीण दरक, अनिल भट्टड, मच्छिंद्र गुलदगड, सुनील देशपांडे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या