राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचा कार्यव्याप राज्य, देश तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारलेला असून कृषी संशोधन, शिक्षण आणि विस्तार क्षेत्रात विद्यापीठाने अनेक उल्लेखनीय बेंचमार्क निर्माण केले आहेत. विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत संसाधने मर्यादित होत चालली असून त्यांचे संवर्धन आणि योग्य व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. विशेषतः कोविड काळानंतर संशोधनासाठी निधी उपलब्ध होण्यात अडचणी येत असून, त्याचा परिणाम संशोधनाच्या गतीवर होत आहे.
जमिनीचे घटते आरोग्य, हवामान बदल आणि वाढती उत्पादन खर्चाची समस्या लक्षात घेता नैसर्गिक शेती पद्धतीवर आधारित संशोधनावर अधिक भर देणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
पुणे येथील कृषी महाविद्यालयात आयसीआयसीआय फाउंडेशन फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथ आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या करारावर कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या उपस्थितीत संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के आणि आयसीआयसीआय फाउंडेशनचे प्रकल्प संचालक दीपक पाटील यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी अधिष्ठाता (कृषी) डॉ. साताप्पा खरबडे, कृषी महाविद्यालय पुणेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. महानंद माने, गणेशखिंड येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुभाष भालेकर, कृषी विज्ञान संकुल काष्टी माळेगावचे डॉ. सचिन नांदगुडे, आयसीआयसीआयचे पदाधिकारी चेतन पाटील, स्वप्निल ढाकळे व नितीन गुरव उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. विलास खर्चे पुढे म्हणाले की, या सामंजस्य करारातून उपलब्ध होणाऱ्या निधीचा उपयोग विद्यापीठातील आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच संशोधन कार्य अधिक सक्षम करण्यासाठी करण्यात येईल. योग्य नियोजनाच्या माध्यमातून या निधीचा वापर करून शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी दीपक पाटील यांनी सांगितले की, आयसीआयसीआय बँक उपजीविका, पर्यावरण आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये सीएसआर निधीतून भरीव योगदान देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच राज्यातील कृषी विद्यापीठांच्या संशोधन प्रकल्पांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी दीर्घकालीन आणि सकारात्मक सहकार्य करण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी सांगितले की, आयसीआयसीआय सारख्या विश्वासार्ह संस्थांच्या सहकार्याचा प्रभावी लाभ घेण्यासाठी विद्यापीठाने दर्जेदार, उद्दिष्टपूर्तीस पूरक आणि शेतकरीहिताला केंद्रस्थानी ठेवणारे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. कृषी संशोधन, पायाभूत सुविधा विकास आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने हा सामंजस्य करार मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार या त्रिसूत्रीवर आधारित विद्यापीठाच्या कार्यपद्धतीनुसार या सामंजस्य कराराची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले. यावेळी डॉ. सुभाष भालेकर यांनी सन 2025-26 मध्ये आयसीआयसीआयच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनिल लोहाटे यांनी केले तर आभार डॉ. सतिश जाधव यांनी मानले. यावेळी कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक, विभागीय कृषी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या