एस. के. सोमय्या प्रा. विद्यामंदिरचे विद्यार्थी भविष्यात नासापर्यंत झेप घेतील - आ. हेमंत ओगले


श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : ग्रामीण भागातील विद्यार्थी गुणवत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर, अगदी नासा (NASA)सारख्या संस्थांपर्यंत पोहोचू शकतात, असा विश्वास श्रीरामपूरचे विद्यमान आमदार हेमंत ओगले यांनी व्यक्त केला. पंचायत समिती श्रीरामपूर व श्रीरामपूर तालुका विज्ञान-गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान गुणवंत विद्यार्थी परीक्षा व इयत्ता नववी गणित संबोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम स्व. एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर, श्रीरामपूर येथे उत्साहात पार पडला.

आ. ओगले पुढे म्हणाले, “आज अनेक विद्यार्थ्यांनी बक्षिसे व सन्मानपत्रे मिळविली, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. मात्र ज्यांना आज सन्मान मिळाला नाही त्यांनी खचून न जाता अधिक उमेदीने प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे योगदान फार मोठे आहे. सचिन तेंडुलकर यांचे उदाहरण डोळ्यांसमोर ठेवावे; त्यांना उत्तम गुरु लाभले. या शाळेत फक्त गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो, हे या विद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण भागात असूनही येथे अत्याधुनिक उपक्रम व प्रयोगशाळा पाहायला मिळतात. या विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना नासासाठी पाठविण्याचा निश्चित प्रयत्न राहील. तसेच या उपक्रमांना आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाकडून उपलब्ध करून दिले जाईल.”

यावेळी शिक्षण संस्थेच्या मॅनेजींग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांनी पंचायत समिती श्रीरामपूर व गणित-विज्ञान अध्यापक संघामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक केले. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उत्तेजन व प्रेरणा मिळते. आ. हेमंत ओगले यांचे सर्व शाळांना सातत्याने विशेष सहकार्य लाभत असते. रयत शैक्षणिक संकुलात असे उपक्रम नेहमीच घेतले जातात. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक व पालक यांनाच या यशाचे श्रेय जाते,” असे त्यांनी नमूद केले.

या सत्कार समारंभास गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती श्रीरामपूर संजीवन दिवे, विस्ताराधिकारी दीपक त्रिभुवन, सुनील दरंदले, सचिव श्रीमती रूपाली पवार, सूर्यकांत सराटे, गणित संघ अध्यक्ष नवनाथ साळवे, विज्ञान संघ अध्यक्ष शशिकांत थोरात, साहेबराव रकटे, विज्ञान संघ अध्यक्ष विजय नान्नर, श्रीरामपूर तालुका विज्ञान परीक्षा प्रमुख अक्षय कदम, अहिल्यानगर गणित अध्यापक मंडळ संघटक नितीन जगताप, नगरसेवक रितेश एडके, योगेश जाधव, एस. के. सोमय्या प्राथमिक विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका पैठणे व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत थोरात यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यकांत सराटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सूर्यकांत सराटे, नितीन जगताप व अक्षय कदम यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या