श्रीगोंद्यात नाचणी लागवड प्रशिक्षणाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


श्रीगोंदा | सुभाष दरेकर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील राष्ट्रीय कृषी विकास योजना, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि पोळ अ‍ॅग्रो सर्व्हिसेस, श्रीगोंदा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा येथे नाचणी लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. भरडधान्यांचे वाढते महत्त्व आणि पोषणमूल्य लक्षात घेता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. आनंद चवई होते. प्रमुख पाहुण्या म्हणून तालुका कृषी अधिकारी श्रीमती क्रांती चौधरी उपस्थित होत्या. यावेळी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषयाचे तज्ज्ञ डॉ. सुनील अडांगळे, कोल्हापूर येथील नाचणी सुधार प्रकल्पाचे कनिष्ठ पैदासकार डॉ. योगेश बन तसेच पोळ अ‍ॅग्रो सर्व्हिसेसचे राहुल पोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात डॉ. आनंद चवई यांनी भरडधान्यांचे पोषणमूल्य अधोरेखित करताना नाचणी व राळा यांसारखी पिके मानवी आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. हरितक्रांतीनंतर रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर वाढल्याने आरोग्यविषयक धोके निर्माण झाले असून त्यावर उपाय म्हणून भरडधान्य शेतीकडे वळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नाचणीमध्ये कॅल्शियम व लोहाचे प्रमाण अधिक असल्याने महिला बचत गटांनी नाचणीच्या मूल्यवर्धनाकडे पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. कृषी विद्यापीठाच्या रेडिओ ‘फुले कृषी वाहिनी’वरील तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

प्रमुख मार्गदर्शन करताना श्रीमती क्रांती चौधरी यांनी शेतकरी गटांना आवश्यक माहिती फार्मर ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल, असे सांगून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. सध्या नाचणीला मोठी बाजारपेठ उपलब्ध असून विक्रीसाठी चांगल्या संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविकात डॉ. सुनील अडांगळे यांनी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत भरडधान्यांची प्रात्यक्षिके राबवून मूल्यवर्धनासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती दिली. डॉ. योगेश बन यांनी नाचणी व पौष्टिक तृणधान्यांची ओळख, लागवड पद्धती, आहारातील महत्त्व आणि शाश्वत शेतीतील भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील राज्य पुरस्कार प्राप्त शेतकरी कलगोंडा टेळे यांनी यशस्वी उन्हाळी नाचणी लागवडीची प्रेरणादायी यशोगाथा शेतकऱ्यांसमोर मांडली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील अडांगळे यांनी केले तर आभार राहुल पोळ यांनी मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमाला ४० पेक्षा अधिक शेतकरी उपस्थित होते. भरडधान्य शेतीकडे वाटचाल करण्यासाठी हा कार्यक्रम शेतकऱ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या