आंबा बागांवर लीफ मायनरचा वाढता धोका


राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचा शेतकऱ्यांना तातडीचा सल्ला

राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्रातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा देणारी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध आंबा पट्ट्यांमध्ये लीफ मायनर या किडीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत असून, ही कीड आता आंबा पिकासाठी गंभीर ठरत असल्याचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

काजू पिकाची प्रमुख कीड म्हणून ओळखली जाणारी अक्रोसेरकॉप्स सिंग्राम्मा (Acrocercops syngramma) ही कीड बदलत्या हवामानामुळे आपले यजमान पीक बदलत असून, पावसाळ्यानंतरच्या दमट वातावरणात आंब्याच्या कोवळ्या पानांवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अहमदनगर, सोलापूर, पुणे तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागांमधून या किडीचे नमुने विद्यापीठातील शास्त्रज्ञांना प्राप्त झाले आहेत.

ही अळी पानांच्या आत सुरुंग तयार करून भक्षण करत असल्याने पानांवर वळणदार खुणा, फोडसदृश सूज व नंतर करड्या-तपकिरी डाग दिसू लागतात. परिणामी कोवळी पाने वाकडी-तिकडी होऊन अकाली गळून पडतात. विशेषतः लहान रोपांवर या किडीचा प्रादुर्भाव अधिक असून एका पानावर १ ते ५ अळ्या आढळून येतात. संपूर्ण जीवनचक्र अवघ्या २० ते २५ दिवसांत पूर्ण होत असल्याने किडीचा प्रसार वेगाने होण्याचा धोका आहे.

या पार्श्वभूमीवर हॉर्टसॅप योजनेचे प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड, प्रकल्प समन्वयक डॉ. संजय कोळसे, संशोधन सहयोगी डॉ. प्रवीण खैरे तसेच कीटकशास्त्र विभागाचे डॉ. सखाराम आघाव यांनी शेतकऱ्यांना तातडीने उपाययोजना राबवण्याचे आवाहन केले आहे.

प्रादुर्भावग्रस्त कोवळी पाने व अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. किडीची कोष अवस्था जमिनीत असल्याने खाली पडलेला पालापाचोळा साफ करून जमिनीची हलकी मशागत करावी, जेणेकरून कोष उन्हात नष्ट होतील. तसेच चिलोनस, सिम्पायसिस, क्रायसोचारिस नेफेरियस, ग्रीन लेसविंग यांसारख्या उपयुक्त मित्रकिडींचे संवर्धन करण्यावर भर द्यावा.

तज्ज्ञांनी स्पष्ट केले की, जरी लीफ मायनर ही कीड आंब्यावर दुय्यम मानली जात असली तरी बदलत्या हवामानामुळे तिचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नियमित निरीक्षण, वेळेवर ओळख आणि योग्य व्यवस्थापन केल्यास संभाव्य नुकसान टाळता येईल, असे आवाहन त्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या