राहुरी प्रतिनिधी : नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळाने (ASRB) घेतलेल्या २०२५ च्या राष्ट्रीय पात्रता परीक्षा (NET) मध्ये डॉ. प्रांजल जालिंदर शेडगे यांनी यशस्वीरीत्या उत्तीर्ण होऊन उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या यशामुळे त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन कारकिर्दीत एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे.
डॉ. शेडगे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून अनुवंश व रोपपैदासशास्त्र (Genetics and Plant Breeding) या विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. संशोधन काळात त्यांनी आधुनिक कृषी संशोधनातील विविध पैलूंवर सखोल अभ्यास करत उल्लेखनीय कार्य केले आहे. सुमित शेटे यांच्या पत्नी तर क्रांतीसेनेचे संघटक जालिंदर शेडगे यांची कन्या आहे.
त्यांच्या या यशामागे कृषी महाविद्यालय, बदनापूर येथील असोसिएट डीन व प्राचार्य तसेच कृषी संशोधन केंद्र, बदनापूर येथील प्रभारी डॉ. डी. के. पाटील यांचे मौल्यवान मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे डॉ. शेडगे यांना संशोधनात दिशा व बळ मिळाले.
डॉ. प्रांजल शेडगे यांच्या या यशाबद्दल पुणे विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य तथा क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, माजी सिनेट सदस्या शोभाताई मुसमाडे- डेंगळे, अशोकराव शेटे, सविताताई शेटे आदींसह शैक्षणिक, संशोधन व कृषी क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, भविष्यात त्या कृषी संशोधन व शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

0 टिप्पण्या