डाळिंबावरील तेलकट डाग व मर रोगाचे शास्त्रोक्त व्यवस्थापन केल्यास उत्पन्नात लक्षणीय वाढ – संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के


राहुरी विद्यापीठ : कोरडवाहू फळपिकांमध्ये डाळिंब हे अत्यंत महत्त्वाचे पीक असून या पिकाने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धीची नवी दिशा दिली आहे. मात्र तेलकट डाग व मर यांसारख्या रोगांमुळे उत्पादनात मोठे नुकसान होत असल्याने या रोगांचे शास्त्रोक्त व वेळेवर व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास डाळिंब उत्पादनात भरीव वाढ होऊ शकते, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागांतर्गत इंडो–इस्राईल कृषी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ (पुणे), डाळिंब गुणवत्ता केंद्र तसेच अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षणाचा समारोप प्रसंगी डॉ. शिर्के अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. बी. टी. पाटील, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. सुभाष गायकवाड, प्रगतशील शेतकरी शामराव लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी वासुदेव लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.

तीन दिवसीय निवासी प्रशिक्षणामध्ये गुटी कलम, छाटणीचे प्रात्यक्षिक, सूत्रकृमी व्यवस्थापन, रोग व कीड नियंत्रण, डाळिंब लागवड व प्रक्रिया यासंबंधी तज्ज्ञांनी सखोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनाबद्दल डॉ. बी. टी. पाटील, डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. अजय हजारे, डॉ. सुवर्णा देवरे, डॉ. प्रकाश मोरे व दत्तात्रय गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मोरे यांनी केले तर आभार डॉ. अजय हजारे यांनी मानले.

या प्रशिक्षणासाठी कानडगाव, तांभेरे व पाथर्डी तालुक्यातील कौडगाव येथील २५ डाळिंब उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय गायकवाड, शंकर गायके व अण्णासाहेब जाधव यांनी विशेष सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या