आंबा भुरी रोगाचा धोका वाढतोय : शेतकऱ्यांसाठी राहुरी कृषी विद्यापीठाचा सतर्कतेचा इशारा


राहुरी विद्यापीठ : डिसेंबर व जानेवारी महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्यास सुरुवात होताच आंबा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असा इशारा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, तसेच वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. संजय कोळसे व डॉ. प्रवीण खैरे यांनी दिला आहे.

या काळात ढगाळ हवामान, रात्रीचे कमी तापमान आणि दिवसा २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान राहिल्यास भुरी रोग झपाट्याने पसरतो. हा रोग ओयडियम मॅन्जीफेरी या बुरशीमुळे होत असून, तिची बीजे वाऱ्यामार्फत पसरतात. रोगाची सुरुवात प्रामुख्याने मोहोर व कोवळ्या पालवीवर होते. मोहोराच्या दांड्याच्या टोकाजवळ पांढऱ्या रंगाची तंतूमय बुरशी दिसून येते व हळूहळू संपूर्ण मोहोरावर तिचा प्रादुर्भाव होतो.

बुरशी पेशींमधील अन्नरस शोषून घेत असल्याने मोहोराची वाढ खुंटते. रोग तीव्र झाल्यास ७० ते ८० टक्के, तर काही वेळा १०० टक्क्यांपर्यंत उत्पादन नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोवळ्या पानांवर रोग आल्यास पाने तांबूस होऊन वाळतात व गळून पडतात. फळधारणेपूर्वी रोग आल्यास फुले गळतात, तर फळधारणेनंतर रोग झाल्यास फळगळ वाढते.

प्रभावी नियंत्रणासाठी तज्ञांचा सल्ला

भुरी रोगाच्या प्रभावी नियंत्रणासाठी मोहोर येण्याच्या १५ दिवस आधीच प्रतिबंधात्मक फवारणी करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी पाण्यात मिसळणारे सल्फर ८० टक्के डब्ल्यू.पी. @ २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

रोगाची लक्षणे दिसताच अ‍ॅझोक्सीस्ट्रोबिन २३ टक्के एस.सी. @ १ मिली किंवा हेक्साकोनाझोल ५ टक्के ई.सी. @ १ मिली प्रति लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. पूर्ण वाढलेल्या झाडासाठी साधारणतः २० लिटर द्रावण आवश्यक असून, १५ दिवसांच्या अंतराने ४ ते ५ फवारण्या कराव्यात. फळधारणेनंतर फवारणीपूर्वी मोहोर स्वच्छ करून फवारणी करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

डिसेंबर–जानेवारी महिन्यात वेळेवर उपाययोजना न केल्यास आंबा उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फवारण्या करून भुरी रोगाचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या