महागुरूस्वामी बार्थोल बरेटो यांच्या उपस्थितीत श्रद्धा-आशेचा जागर
श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] — हरेगाव येथील संत तेरेजा चर्च, मतमाउली भक्तिस्थान येथे नाताळ उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ज्युबिली वर्षाचा समारोप सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या पवित्र सोहळ्यास नाशिक धर्मप्रांताचे महागुरूस्वामी बार्थोल बरेटो प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
समारोप प्रसंगी बोलताना महागुरूस्वामी बरेटो यांनी सांगितले की, “आज वर्षाच्या शेवटच्या रविवारी आपण प्रभू येशू, पवित्र मारिया व संत योसेफ यांच्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहोत. आज येथे एकत्र येऊन आपण आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी देवाचा आशीर्वाद मागत आहोत. आपण केवळ मानवी कुटुंबाचा भाग नाही, तर देवाच्या कुटुंबाचा—म्हणजेच देऊळमातेचा—एक अविभाज्य घटक आहोत.”
आई-वडिलांचा सन्मान करण्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी चौथ्या आज्ञेचा संदर्भ दिला. “जो आपल्या वडिलांचा सन्मान करतो, त्याला देव संपत्ती व दीर्घायुष्य अशी दोन वरदाने देतो,” असे सांगत प्रेम, कृतज्ञता, दया, क्षमा व परस्पर काळजी हे गुण अंगीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
महागुरूस्वामी पुढे म्हणाले, “गेल्या वर्षी २०२४ मध्ये संत अन्ना कॅथेड्रल येथे ज्युबिली वर्षाचे उद्घाटन झाले होते. आज एका वर्षानंतर या पवित्र यात्रेची सांगता होत आहे. आपण या जगाचे कायमचे रहिवासी नसून आशेकडे, स्वर्गाकडे जाणारे तीर्थयात्री आहोत. या यात्रेत आजारी, गरीब, एकटे, स्थलांतरित, युद्धग्रस्त, निराश तरुण व विसरले गेलेले वृद्ध यांना आशेचा किरण दाखवणे हे आपले कर्तव्य आहे.”
“ज्युबिली वर्ष संपले तरी आशेची यात्रा सुरूच राहील,” असे सांगत त्यांनी सर्वांना नव्या उत्साहाने आशेचे तीर्थयात्री बनण्याचे व्रत घेण्याचे आवाहन केले.
या भव्य कार्यक्रमास हरीगावचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. डॉमनिक रोझारिओ, फा. फ्रान्सिस ओहोळ, फा. संतान रॉड्रीग्ज, फा. ज्यो गायकवाड यांच्यासह नाशिक धर्मप्रांतातील सर्व धर्मगुरू उपस्थित होते. प्रारंभी महागुरूस्वामी व सर्व धर्मगुरूंनी प्रभू येशूची प्रतिमा (क्रॉस) घेऊन भक्तिमय मिरवणूक काढली. ख्रिस्तप्रसादानंतर सर्व भाविकांना केक वाटण्यात आला. यावेळी फा. डॉमनिक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी महागुरूस्वामी बार्थोल बरेटो यांनी सर्व भाविक, धर्मगुरू व धर्मभगिनींचे मनःपूर्वक आभार मानले. श्रद्धा, सेवा आणि आशेचा संदेश देणारा हा समारोप सोहळा भाविकांच्या मनावर दीर्घकाळ ठसा उमटवून गेला.


0 टिप्पण्या