हरेगाव येथे नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा


श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : हरेगाव येथील संत तेरेजा चर्च, मतमाऊली भक्तिस्थान येथे प्रभू येशू ख्रिस्त जयंती व नाताळ सण दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हे कार्यक्रम एक जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत.

संत तेरेजा शैक्षणिक संकुलात बाळ येशूच्या आगमनाचा सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात पार पडला. यावेळी प्रजा जागृती शिक्षण संस्थेचे सचिव व हरेगाव धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. डॉमिनिक रोझारिओ, संस्थेचे सहसचिव व पर्यवेक्षक रे. फा. फ्रान्सिस ओहोळ, प्राचार्य जालिंदर बलमे, मुख्याध्यापक सचिन शिंगाडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख धर्मगुरू रे. फा. डॉमिनिक रोझारिओ यांनी मनोगतातून नाताळचा संदेश देताना सांगितले की, दया, क्षमा व शांततेचा संदेश देणारे हे पवित्र पर्व असून त्यामुळे प्रत्येक घराघरात आनंदाचे वातावरण निर्माण होते. बाळ येशूच्या जीवनातून प्रेरणा घेऊन शिस्त, प्रेम व सदाचार अंगीकारल्यास समाजात सौहार्द आणि आनंद नांदेल, असे त्यांनी नमूद केले.

नाताळ दिनी सकाळी चर्चमध्ये पवित्र मिस्साचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रभू येशू ख्रिस्त यांचे जीवनकार्य व नाताळ सणाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. मिस्सावेळी रे. फा. डॉमिनिक रोझारिओ, रे. फा. फ्रान्सिस ओहोळ यांच्यासह अन्य धर्मगुरू सहभागी झाले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रार्थनेत सहभाग घेतला.याशिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत आकर्षक नृत्यप्रस्तुती, बाळ येशूच्या जन्मावर आधारित नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले.

नाताळनिमित्त हरेगाव येथे आमदार हेमंत ओगले, नूतन नगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, सिद्धार्थ मुरकुटे, विरेश गलांडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, जितेंद्र गोलवंड, सुभाष बोधक, सुभाषराव पंडित, अनिल भनगडे, ज्ञानेश्वर बांद्रे, सुनील साठे, बाळासाहेब पारधे, राजेंद्र नाईक, संजय साळवे, सुनील शिंगारे, भीमराज बागुल आदी मान्यवरांनी भाविकांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या