यावेळी हरेगावचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. डॉमनिक रोझारिओ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपण २५ डिसेंबरपासून ख्रिस्त जयंतीचा सोहळा साजरा करीत आहोत. या संपूर्ण आठवड्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रभू येशू ख्रिस्त शांतीचा राजा असून, ‘तुम्हाला शांती असो’ या अनमोल वचनाद्वारे त्यांनी संपूर्ण मानवजातीला शांतीचा संदेश दिला आहे. हीच शांती आपल्या अंतःकरणात, कुटुंबात, समाजात आणि अखेरीस संपूर्ण जगात नांदावी, या प्रार्थनेतून ही शांती मिरवणूक काढण्यात आली.”
दि. ३० डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सर्व वृद्ध भाविकांसाठी पवित्र मिस्साचे अर्पण करण्यात आले. ‘माणुसकीची भिंत’ या संस्थेच्या वतीने वृद्ध भाविकांना स्नेहभोजन देण्यात आले तसेच काहींना आधारकाठ्यांचे वाटप करण्यात आले. ही सामाजिक बांधिलकी उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरली. शांती मिरवणुकीत सजवलेल्या वाहनातून नाताळबाबा तसेच प्रभू येशू जन्माचा आकर्षक देखावा सादर करण्यात आला. संपूर्ण धर्मग्रामात भक्ती, आनंद आणि शांततेचे वातावरण पसरले होते.
आगामी कार्यक्रमांबाबत माहिती देताना रे. फा. डॉमनिक रोझारिओ यांनी सांगितले की, दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजता पवित्र तास व पवित्र मिस्सा होणार आहे. दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.१५ वाजता देवमातेचा सण साजरा करण्यात येईल, तर दि. ४ जानेवारी रोजी प्रभूच्या प्रगटीकरणाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी सहकारी धर्मगुरू, धर्मभगिनी आणि चर्चच्या पदाधिकाऱ्यांसह केले आहे.

0 टिप्पण्या