श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : हरेगाव येथील संत तेरेजा चर्च, मतमाऊली भक्तीस्थान येथे ख्रिस्त जयंती नाताळ सणानिमित्त भक्ती, आनंद व सांस्कृतिक उत्सवाचे वातावरण निर्माण करणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसरात नाताळचा उत्साह, श्रद्धा आणि एकतेची भावना अनुभवायला मिळणार आहे.
दि. २४ डिसेंबर रोजी सायं. ६ वाजता रांगोळी स्पर्धा, तर रात्री १० वा. नाताळ गीते व पवित्र संगीत मिस्सा होणार आहे. २५ डिसेंबर – नाताळदिनी सकाळी ८.१५ वा. पवित्र मिस्सा संपन्न होईल. २६ डिसेंबर रोजी रक्तसाक्षी संत स्टीफन यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात येणार असून सायंकाळी ६ वा. नाताळ गीत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. २७ डिसेंबर रोजी संत योहान प्रेषित सुवार्तीक यांचा सण असून सायंकाळी नृत्य-गीत स्पर्धा होणार आहे.
२८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वा. पवित्र कुटुंबाचा सण, तर दु. ४.३० वा. ज्यूबिली वर्ष सांगता सोहळ्यानिमित्त पवित्र मिस्सा होईल. ३० डिसेंबर रोजी मेणबत्ती मिरवणूक काढण्यात येणार आहे. ३१ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वा. पवित्र तास व पवित्र मिस्सा, तर १ जानेवारी रोजी नूतन वर्षाच्या प्रारंभी सकाळी ८.१५ वा. देव मातेचा सण साजरा करण्यात येईल. ४ जानेवारी रोजी प्रभूच्या प्रकटीकरणाचा सोहळा, आणि ११ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वा. प्रभूचा स्नान संस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सर्व भक्तीमय व सांस्कृतिक कार्यक्रमांत सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख धर्मगुरू रे. फा. डॉमिनिक रोझारिओ यांनी केले आहे. नाताळच्या या पवित्र पर्वात भक्ती, आनंद व एकात्मतेचा अनुभव घेण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे त्यांनी सांगितले.

0 टिप्पण्या