भोर यांच्या निसर्ग व शेतीमातीवरील कवितांचा यथोचित सन्मान
नाशिक : गिरणा गौरव प्रतिष्ठान, नाशिक यांच्या वतीने गेल्या वीस वर्षांपासून साहित्य क्षेत्रात दिला जाणारा जेष्ठ अभिनेत्री पद्मश्री स्मिता पाटील शब्दपेरा काव्यसंग्रह पुरस्कार यंदा अहिल्यानगर येथील कवी, लेखक, पत्रकार व शेतकरी अशी बहुविध ओळख असलेले युवा कवी बाळासाहेब भोर यांच्या ‘प्रवरेच्या काठावरून’ या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे.
‘प्रवरेच्या काठावरून’ हा बाळासाहेब भोर यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून, या संग्रहात त्यांनी निसर्गाच्या विविध रूपांचे, ग्रामीण जीवनाचे तसेच शेतीमातीच्या वास्तवाचे अत्यंत प्रभावी व नेमक्या शब्दांत काव्यात्म चित्रण केले आहे. मातीशी नाते सांगणारी त्यांची कविता संवेदनशीलतेसह वास्तवाचा ठाम आवाज मांडते.
आजवर भोर यांनी विविध वृत्तपत्रांतून शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यांसारख्या समाजोपयोगी विषयांवर सातत्याने लेखन करून आपल्या लेखणीला सामाजिक भानाची धार दिली आहे. त्यांच्या या साहित्यिक योगदानाची दखल घेत हा सन्मान जाहीर करण्यात आला आहे.
दि. १८ जानेवारी रोजी नाशिक येथे होणाऱ्या अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात दुपारी १ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. अशी माहिती गिरणा गौरव प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर व राजेश्वर शेळके यांनी दिली.
या पुरस्कार सोहळ्यास कवी, लेखक, विचारवंत व साहित्यप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या