अन्नदानातून वाढदिवस साजरा : सामाजिक बांधिलकीचा आदर्श उपक्रम


श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) — “अन्नदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त ध्येयाने श्रीरामपूर येथील विधिज्ञ सोमनाथ चंद्रकांत कासार यांनी आपला वाढदिवस सामाजिक जाणिवेतून साजरा करत एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले. कोणताही अनाठायी खर्च टाळून त्या रकमेचा उपयोग गरजूंसाठी व्हावा, या भावनेतून त्यांनी वृद्धाश्रम तसेच दिव्यांग व मूकबधिर विद्यार्थ्यांना अन्नदान केले.

नेवासा येथील शरणापूर वृद्धाश्रम, फत्तेपूर–रांजणगाव रोड येथे दुपारी १२.३० वाजता वृद्धांना सप्रेम भोजन देण्यात आले. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता दिव्यांग व मूकबधिर विद्यालय, श्रीरामपूर येथे विद्यार्थ्यांसाठी अन्नदान कार्यक्रम पार पडला. या दोन्ही उपक्रमांना माजी पोलीस उपनिरीक्षक सूरज आगे, अक्षय आगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.

या वेळी मनोगत व्यक्त करताना सोमनाथ कासार म्हणाले, “जशी माझी आजी आहे, तसेच मला येथील सर्व वृद्ध वाटतात. अन्नदान करणे हे माझे कर्तव्य आहे. जे काही मी देतो, ते परमेश्वराने दिलेले आहे. मी केवळ निमित्तमात्र असून, परमेश्वराने दिलेल्या समृद्धीतून ‘खारीचा वाटा’ उचलण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.”

कासार यांच्या या उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याची नवी दिशा दाखवली असून, सामाजिक संवेदनशीलतेचा आणि मानवतेचा सुंदर संदेश समाजात पोहोचवला आहे. अशा उपक्रमांमुळेच समाज अधिक सुसंस्कृत आणि सहृदय बनतो, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या