शेतीपंपांना दिवसा आठ तास वीज द्या; बिबट्यांच्या वाढत्या धोक्यावर तातडीने उपाय करा – सुरेशराव लांबे पाटील


राहुरी | प्रतिनिधी : शेतकरी वर्ग कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांना सामोरा जात असतानाच आता वन्यजीवांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संपूर्ण राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देणे जीवघेणे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शेतीपंपांसाठी किमान दिवसा आठ तास वीजपुरवठा देण्याचा तातडीचा निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष व शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी केली आहे.

माध्यमांशी बोलताना लांबे पाटील म्हणाले की, राहुरी तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी, शेतमजूर, महिला, लहान मुले तसेच जनावरे यांना आपला जीव गमवावा लागत आहे. रात्री पाणी देताना अनेकांना प्राण संकटात टाकावे लागत असून काहींना जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे वन्यजीवांबरोबरच मनुष्यजीवाचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा अस्तित्वात असला, तरी जर मनुष्यजीव सुरक्षित नसेल तर केंद्र व राज्य शासनाने या कायद्यात मूलभूत बदल करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करणे, मादी बिबट्यांची नसबंदी शस्त्रक्रिया करणे तसेच त्यांना बंदिस्त ठेवून त्यांच्या खाण्याची योग्य व्यवस्था करावी, अशी ठोस मागणी त्यांनी मांडली.

“जगाचा पोशिंदा असलेला शेतकरीच जर असुरक्षित असेल, तर शेती व्यवसाय आणि ग्रामीण अर्थव्यवस्था दोन्हीही धोक्यात येतील,” असा इशाराही लांबे पाटील यांनी दिला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शासनाने तातडीने निर्णय घेऊन दिवसा वीजपुरवठा, वन्यजीव नियंत्रण आणि कायद्यात सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी त्यांनी यावेळी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या