राहुरी विद्यापीठ : हवामान बदलाचा थेट व प्रतिकूल परिणाम शेती आणि पिकांवर होत असून, यावर्षी खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसामुळे अनेक भागांत अजूनही जमिनीत जादा ओलावा आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या रखडल्या असून, अशा परिस्थितीत उशिरा तयार होणाऱ्या व बदलत्या हवामानास अनुकूल वाणांची निर्मिती करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात रब्बी व उन्हाळी हंगाम–2025 साठी विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. विलास खर्चे बोलत होते.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर, पुणे विभागीय कृषि सहसंचालकांचे प्रतिनिधी म्हणून कृषि अधिकारी राऊत तसेच श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी प्रविण गोसावी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. खर्चे म्हणाले की, पारंपरिक शेती पद्धतीचे दिवस आता मागे पडले आहेत. हवामान बदलामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होत असून, निविष्ठा वापरण्यास पोषक वातावरण राहात नाही. परिणामी उत्पादनक्षमता घटते. अशा वेळी विद्यापीठाने विकसित केलेले हवामानानुकूल व काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल. हे तंत्रज्ञान गाव, तालुका व जिल्हा पातळीवर विस्तार यंत्रणांच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचविण्याची गरज आहे. काटेकोर शेतीमुळे निविष्ठांचा वापर कमी होऊन उत्पादन खर्च घटेल, असेही त्यांनी नमूद केले. खरीप दिन, रब्बी दिन यांसारख्या उपक्रमांत कृषि विभागाने अधिकाधिक शेतकऱ्यांचा सहभाग घडवून आणावा, जेणेकरून विद्यापीठातील संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात डॉ. गोरक्ष ससाणे यांनी कृषि विभागातील अधिकाऱ्यांनी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, असे सांगितले. संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधन अहवाल सादर केला. अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी पाऊस लांबल्याने पेरण्या उशिरा झाल्या असून, जमिनीत जादा ओलाव्यामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली. अशा वेळी शेतकऱ्यांनी विद्यापीठाकडून प्रसारित होणाऱ्या सल्ला व मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
बैठकीत कोल्हापूर, नाशिक व पुणे विभागांच्या कृषि सहसंचालकांनी आपापले विभागीय अहवाल सादर केले. यावेळी कांदा व हरभऱ्यावरील मर रोग, पेरूवरील फळमाशी, ड्रोनद्वारे फवारणी, कांदा पिकांचे व्यवस्थापन, परदेशी भाज्या, फुले मायक्रोग्रेड-2 व नॅनो युरिया, मका व भूईमूग, क्रॉप कव्हर, बियाणे गुणवत्ता, हरभरा, हळद व आले आदी विषयांवर विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख यांनी केले तर आभार डॉ. सुनील अडांगळे यांनी मानले. या बैठकीसाठी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता, कृषि सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, सर्व विभागप्रमुख, उपविभागीय कृषि अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ तसेच कृषि विभागाचे अधिकारी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या