श्रीगोंदा (प्रतिनिधी) : हिरडगाव परिसरात उसतोड टोळ्यांचा प्रश्न चिघळला असून, संतप्त शेतकऱ्यांनी गौरी शुगर कारखान्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. गावात मोठा साखर कारखाना असूनही शेतकऱ्यांना मूलभूत सोयी-सुविधांपासून वंचित ठेवले जात असल्याचा गंभीर आरोप करत क्रांतीसेना व ग्रामपंचायत हिरडगावच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
गौरी शुगरचा गावात कारखाना असल्याचा अभिमान असला, तरी कारखान्याचे अधिकारी व व्यवस्थापन गावाशी पूर्णपणे तुटलेले असल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. कारखान्यामुळे अपेक्षित लाभ मिळण्याऐवजी धूळ, वाहतूक, शेतीतील अडथळे व ऊस तोड विलंब असे दुष्परिणामच अधिक सहन करावे लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
गेल्या १५ दिवसांपासून सतत पाठपुरावा करूनही उसतोड टोळ्या मिळत नसल्याने हिरडगावातील ऊस तोड जवळपास ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. गावात मोठ्या प्रमाणावर ऊस उपलब्ध असताना आणि कारखान्याची क्रशिंग क्षमता उत्तम असतानाही टोळ्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान अटळ ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वेळेत तोड न झाल्यास ऊसाला तुरे आल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी १५ डिसेंबर २०२५ पर्यंत हिरडगावात किमान चार ते पाच उसतोड टोळ्या तात्काळ द्याव्यात, अशी ठाम मागणी केली आहे. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता कारखान्याचे गेट बंद आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा क्रांतीसेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर व हिरडगाव ग्रामपंचायतीने दिला आहे. आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी संबंधित शेतकी अधिकारी व कारखाना प्रशासनाची राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, गौरी शुगर कारखान्याचे मॅनेजर श्री. यादव यांना उसतोड टोळ्यांच्या मागणीचे निवेदन देण्यात आले. दोन दिवसांत दोन टोळ्या देण्याचे आश्वासन त्यांनी दिले असले, तरी शेतकरी आता कृतीची वाट पाहत आहेत.
या वेळी रामदास बनकर, भरत भुजबळ, चेअरमन गंगाराम दरेकर, युवा नेते बाळासाहेब शिंदे, राजेंद्र दरेकर, मा. उपसरपंच चिमाजी दरेकर, मा. उपसरपंच कैलास दरेकर, मा. व्हाइस चेअरमन नवनाथ गुणवरे, मा. व्हाइस चेअरमन संजय दरेकर, वसंत दरेकर, कल्याण दरेकर, देवराव मोरे, आदेश भुजबळ, महेश बावधनकर, संतोष भुजबळ, राजेंद्र किसन दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

0 टिप्पण्या