राहुरी विद्यापीठ – डाळिंब फळातील औषधी गुणधर्म, जीवनसत्वे आणि खनिजे यामुळे वाढती मागणी पाहता, फक्त उत्पादनावर न थांबता डाळिंब प्रक्रिया उद्योगाकडे लक्ष दिल्यास शेतकरी अधिक सक्षम व आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकतात, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागांतर्गत इंडो-इस्राईल कृषी प्रकल्प, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे, डाळिंब गुणवत्ता केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डाळिंब लागवड व प्रक्रिया या विषयावर आयोजित उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. शिर्के म्हणाले, “प्रक्रियायुक्त पदार्थांना देश-विदेशात मोठी मागणी आहे. फळाच्या तुलनेत प्रक्रियायुक्त उत्पादनांना अधिक किंमत मिळत असल्याने शेतकऱ्यांनी उत्पादनाबरोबर प्रक्रियेकडे नक्कीच वळावे. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढून आर्थिक स्थैर्य निर्माण होईल.”
कार्यक्रमास उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी.टी. पाटील, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस.पी. गायकवाड आणि कृषि विभागाचे सहाय्यक कृषि अधिकारी डी.आर. पाटील उपस्थित होते.
प्रास्ताविकात बोलताना डॉ. बी.टी. पाटील यांनी सांगितले की, “योग्य जमीन, योग्य वाण आणि शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास भविष्यातील धोके कमी होतात. डाळिंबाला गेल्या वर्षभरात उत्तम भाव मिळत असून स्पर्धेत टिकण्यासाठी वैज्ञानिक व्यवस्थापन अत्यावश्यक आहे.”
तीन दिवसांच्या या प्रशिक्षणात डाळिंब लागवड, उत्पादन तंत्रज्ञान, कीड-रोग व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योग यांवर नामांकित तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. अजय हजारे यांनी मानले. या वेळी डॉ. सचिन मगर, डॉ. सुवर्णा देवरे तसेच कानडगाव, निंभेरे आणि तांभेरे येथील 25 डाळिंब उत्पादक शेतकरी उत्साहात उपस्थित होते.

0 टिप्पण्या