नेवासा तालुक्यातील बकु-पिंपळगावमध्ये कृषीदूतांचे उत्साहात स्वागत


शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा होणार प्रसार

नेवासा प्रतिनिधी : तालुक्यातील प्रगतीशील गाव म्हणून ओळख असलेल्या बकु-पिंपळगाव येथे शेती क्षेत्रातील अद्ययावत तंत्रज्ञान व शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या उद्देशाने पाच कृषीदूतांचे (RAWE – Rural Agricultural Work Experience) आगमन झाले आहे. या उपक्रमांतर्गत गावातील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून शेतीविषयक ज्ञान पोहोचविले जाणार आहे.

ग्रामपंचायत बकु-पिंपळगाव यांच्या वतीने सरपंच सौ. सुनिता बापु लांडगे व उपसरपंच अरुण त्रिंबक हंडाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीदूतांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी आर. आर. घोगरे व तलाठी अमोल केळगेंद्रे यांनी गावाची सामाजिक, आर्थिक व कृषी परिस्थिती यांचा सविस्तर आढावा सादर करून कृषीदूतांना त्यांच्या कार्यासाठी योग्य मार्गदर्शन केले. या रावे कार्यक्रमाअंतर्गत शेतीसंबंधी विविध उपक्रम राबविले जाणार असून, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश तुरबतमट, कार्यक्रम समन्वयक प्रा. मनोज माने, कार्यक्रम अधिकारी प्रा. संदीप सोनवणे तसेच इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन कृषीदूतांना लाभणार आहे, अशी माहिती कृषीदूत संकेत सुरेश म्हसे यांनी दिली.

या उपक्रमात सहभागी झालेल्या कृषीदूतांमध्ये संकेत म्हसे, किरण पुरी, सुमित केसकर, विशाल राजदेव व आविष्कार विटनोर यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी पुढील काही दिवसांत गावातील शेती व्यवस्था, पीक पद्धती, नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन यावर सखोल अभ्यास करणार आहेत. प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करत शेतकऱ्यांच्या अडचणी, जीवनमान, सामाजिक-आर्थिक स्थिती, साक्षरतेचे प्रमाण तसेच कृषी पद्धतींचा अभ्यास केला जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना माती व पाणी परीक्षण, पिकांवरील रोग-किड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, जैविक शेती तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती कृषीदूतांकडून देण्यात येणार आहे.

या उपक्रमास ग्रामपंचायत सदस्य सौ. मोनिका मते, सौ. सविता जांभळकर, सौ. सुशिला पातारे, बापु माळी व सोमनाथ वरकड यांनी सक्रिय पाठिंबा दर्शवित कृषीदूतांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच संगणक परिचालक अक्षय पांढरे हे तांत्रिक सहकार्य करत आहेत. या उपक्रमामुळे बकु-पिंपळगावमधील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची दिशा मिळून शेती अधिक शाश्वत व लाभदायक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या