शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी 100% अनुदानावर तार कुंपण योजना तात्काळ राबवा – पवार


राहुरी : महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जंगली व मोकाट जनावरांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट, वाघ, रानडुक्कर यांचा मानववस्तीत वाढता वावर शेतकऱ्यांच्या जीवावर उठत असून, लहान मुले, वृद्ध नागरिक आणि पशुधन यांना याचा मोठा फटका बसत आहे. अनेक निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे, पशुधनाचे तसेच कुटुंबीयांच्या जीवाचे संरक्षण व्हावे, यासाठी शेतजमिनीभोवती तारेचे कुंपण करण्यासाठी 100 टक्के अनुदानाची योजना तात्काळ लागू करावी, अशी ठाम मागणी सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी शासनाकडे केली आहे.

रात्री अपरात्री शेतात पाणी भरण्यासाठी जाताना शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. दिवसरात्र मेहनतीने उभे केलेले खरीप, रब्बी, भाजीपाला व फळबागांचे पीक रानडुकरांकडून एका रात्रीत उद्ध्वस्त होत आहे. या अचानक होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असून, आर्थिक कंबरडाच मोडत आहे.

जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य व वेळेत मोबदला देण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांनी समन्वयाने काम करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

तार कुंपण योजना राबविताना अत्यल्प कागदपत्रांवर प्रक्रिया करून, सर्व आवश्यक साहित्य अनुदानावर उपलब्ध करून देण्यात यावे, जेणेकरून गरीब व मध्यम शेतकऱ्यांनाही योजनेचा लाभ घेता येईल, अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली.

शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा असतानाही आज शेतकरी अडचणींच्या गर्तेत सापडला आहे. अनियमित वीजपुरवठा, शेतीमालाला कमी दर आणि त्यातच जंगली प्राण्यांचे हल्ले यामुळे शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. शासनाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने पाहून तात्काळ ठोस निर्णय घ्यावा, अशी कळकळीची मागणी करण्यात आली आहे.

या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री, कृषी मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव (कृषी), पोलीस महासंचालक, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पोलीस अधीक्षक, जिल्हा कृषी अधीक्षक व गटविकास अधिकारी राहुरी यांना निवेदन देण्यात आले आहे.

शासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास उपोषण तसेच उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब पवार यांनी दिला असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासनच जबाबदार राहील, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या