राहुरी विद्यापीठ : आपल्या देशातील निसर्गाच्या विविधतेमुळे सर्व प्रकारच्या मातीवर आपल्या देशातील शास्त्रज्ञांचा अभ्यास सर्वोकृष्ट होता. पूर्वी सर्व जगाला आपण मृदाशास्त्र शिकवत होतो. पण आपण मुलभुत मृदशास्त्रापासून जसेजसे दूर होत चाललो आहे. त्यामुळे मृदशास्त्राच्या संशोधनात आपण जगाच्या तुलनेत फार मागे पडलो आहे. मुलभुत मृदशास्त्र व नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी मृदविज्ञान यावर अभ्यास व संशोधन गरजेचे असल्याचे प्रतिपादन भारतीय अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनाचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयातील मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग आणि जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बदलत्या हवामानाच्या अनुषंगाने नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या विषयावर भारतीय अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनाचे उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी यांचे तज्ञ व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर अधिष्ठाता (कृषि) डॉ. प्रमोद रसाळ, मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. बापुसाहेब भाकरे, कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक तथा कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनिल गोरंटीवार आणि कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे उपस्थित होते.
डॉ. चौधरी पुढे म्हणाले विद्यार्थ्यांना मृदविज्ञान व कृषि रसायनशास्त्रात अद्ययावत ठेवण्यासाठी जगात सुरु असलेल्या मृदविज्ञानाच्या नविन विषयांचा समावेश अभ्यासक्रमात असणे गरजेचे आहे. यामध्ये बदलत्या हवामानातील मृदविज्ञान, कृषिमध्ये बायोसलाईन, ट्रान्सबॉन्ड्री सॉईल सायन्स, डिजीटल मृदशास्त्र, नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनासाठी मृद विज्ञान या शाखांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असावा. तसेच प्राध्यापकांची क्षमता विकास करण्यासाठी त्यांचे व विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थाला अभ्यास दौरे आयोजीत करणे आवश्यक आहे.
अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील म्हणाले कृषिच्या विद्यार्थ्यांनी कृषि संशोधनात आवड निर्माण करुन त्यात आपले भविष्य घडवावे. विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान अद्ययावत ठेवले तर जगातील सर्वोत्कृष्ट मृदशास्त्र विभाग व प्रयोगशाळा या आपल्या देशात निर्माण होतील. सर्वोत्कृष्ट बनण्याचा विद्यार्थ्यांनी ध्यास धरावा. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते खडक व खनीज संग्रहालय, मृदा बँक, विद्यार्थ्यांसाठी संगणक लॅब आणि इंटरॅक्ट्रीव्ह क्लासरुमचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी केले. यावेळी हळगाव कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, सर्व विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रीतू ठाकरे यांनी केले तर आभार डॉ. विजय पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विद्यार्थी ऑनलाईन आधि ऑफलाईन मोडने उपस्थित होते.
सकाळच्या सत्रात उपमहासंचालक डॉ. एस.के. चौधरी यांनी कास्ट प्रकल्पाच्या प्रक्षेत्रास व सेंद्रिय शेती पध्दती प्रकल्पाला भेट देवून संशोधनाची माहिती घेतली. यावेळी ड्रोनद्वारे उसशेतीला फवारणीचे प्रात्यक्षिक आयोजीत करण्यात आले होते. कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सहसंशोधक डॉ. एम.जी. शिंदे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. उल्हास सुर्वे व डॉ. पवन कुलवाल यांनी संशोधनाची माहिती दिली. यावेळी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, बारामती येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. जगदिश राणे व माजी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जे.व्ही. पाटील यावेळी उपस्थित होते.
0 टिप्पण्या