काही महसूल अधिकाऱ्यांशी संगनमत
करून ठेकेदाराचे फावते आहे !
अहमदनगर/ जावेद शेख : राज्याचे महसूलमंत्री यांचा जिल्हा असलेल्या अहमदनगर जिल्ह्याच्या नगर तालुक्यात काही महसूल अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदार कंपनी शासनाच्या महसुलास अक्षरशः कोट्यावधींचा चुना लावत असल्याचे दिसून येत आहे. यावर कारवाई करण्याऐवजी महसूल यंत्रणा मुग गिळून गप्प बसल्याने संबंधित अधिकारी- ठेकेदार संगनमताचा संशय अधिक प्रमाणात बळावत आहे.
सविस्तर असे की, नगर तालुक्यातील देहरे- वांबोरी रोडलगत देहरे- इस्लामपूर शिवेवर, नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्ग क्र.१६० रस्त्याचे कामे करणाऱ्या शिंदे डेव्हलपर्स प्रा.लि. कंपनीच्या ठेकेदाराकडुन तथा सदर कंपनीच्या अंतर्गत असलेल्या ठेकेदार कंपनी येथील दगडखाणीत बोअरवेल व ब्लास्टिंग करण्यासाठी शासनाची कुठलीही अधिकृत परवानगी न घेता अख्खा डोंगरच्या डोंगरच पोखरून धोकेदायक पध्दतीने दिवसाढवळ्या तथा पहाटेच्या सुमारास फार मोठ्या प्रमाणात डेटोनेटर (जिलेटीन) सारखे तीव्र स्फोटके बोअरवेलमध्ये टाकुन बोअर ब्लॅस्टींग करून (सुरुंग) उडवत शासनाच्या नियमांना अक्षरक्ष: पायदळी तुडवत मोठ्या प्रमाणात उत्खनन करून निव्वळ धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडला जात आहे आणि बुडणारही आहे.
सदरील खाण ही गट क्र.७६/१ मौजे इस्लामपूर व मौजे देहरे गट क्र.२६३,२६४ वांबोरी रस्त्यालगत असून रस्त्याशेजारी मोठी लोकवस्ती व सरक परिवार राहत आहेत. ब्लास्टींग झाल्यानंतर सरक परिवार यांचे घरावर मोठ्या प्रमाणात दगड पडून घराचे नुकसान झाले आहे. तसेच सरक परिवारातील एक महिला उठलेल्या या दगडांमुळे शरीरास दगड लागुन गंभीर जखमी देखील झाली होती, परंतू दैव बलवत्तर म्हणून महिलेचे प्राण हे बालंबाल वाचले, म्हणजेच ही ठेकेदार कंपनी सर्व नियम धाब्यावर बसवून असे अनाधिकृत उत्खनन मोठ्या प्रमाणात दिवसाढवळ्या सात महिन्यांपासुन करत होती व करत आहे. यांना अनाधिकृत कामासाठी तातडीने प्रतिबंध करण्याऐवजी अनेक अधिकारी आपल्या आर्थिक हित जोपासण्यासाठी म्हणा अथवा पाठिशी घालणे म्हणा केवळ थातूरमातूर कारवाई करून करोडोंचा दंड करण्याऐवजी नाममात्र दंड करुन पुन्हा त्यांना सही सलामत सोडत आहेत. तसेच ठेकेदारांचेच बरोबर असल्याचे सांगत निवेदनकर्त्यांची चालढकल आणि दिशाभूल करत आहेत. ही वस्तूस्थिती आहे. यामुळे याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी व सरक परिवाराने सदर ठेकेदार कंपनी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेले असले तरी अद्यापही कुठलीही मोठी कारवाई होताना दिसुन येत नाही. सदरील ठेकेदार कंपनी ही अनाधिकृत गौणखनिजाचे उत्खनन व वाहतूक करत आहे. शेकडो गाड्यांच्या माध्यमातून वाहतुक दिवसंरात्र चालू असल्यामुळे सभोवताली प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे परिक्षा चालू असलेल्या मुलांना व परीसरातील शेतकऱ्याना खुपच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. नगर तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सुध्दा दिलेले असताना संबंधित अधिकारी यांनी थातूरमातूर चौकशी करुन निवेदनांना केराची टोपली दाखवली आहे.इतर सर्व सामान्यांना नियमांचे पाढा वाचून दाखवणारे अधिकारी मात्र मिलिभगत करून कुंभकर्णी झोपेत दिसून येत आहे. यासाठी संबंधित प्रशासनाने वरील भयावह गोष्टीकडे त्वरित लक्ष द्यावे व संबंधितांवर उचित कार्यवाही करावी.अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून "ढोल बजाओ आंदोलन" करण्यात येईल. असा इशाराही वांबोरी, इस्लामपूर आणी देहरे ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.
जर यापुढील काळात या परिस्थितीमुळे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील. असेही ग्रामस्थांनी यावेळी बोलुन दाखविले असले तरी यामुळे पारदर्शी कारभार असलेले कर्तव्यदक्ष महसूल मंत्री महोदयांची यामध्ये नाहक बदनामी होत असल्याने त्यांनी सदरील प्रकरणी तात्काळ लक्ष घालावे अशीही जोरदार मागणी होत आहे.
0 टिप्पण्या