लोणी : तालुक्यातील राजकारणात सत्ताधाऱ्यांपुढे सक्षम राजकीय शक्ती नसल्यामुळेच तालुक्यात विखे सत्तेत आहे, अशी प्रतिक्रीया जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी दिली.

आगामी काळात विखेंना आव्हान देण्यासाठी तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकजुटता दाखवत एकत्र येण्याची गरज असुन तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आव्हान त्यांनी केले आहे.

सध्या तालुक्यात सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांपेक्षा त्यांच्या विरोधी समर्थकांची संख्या मोठी आहे. परंतु तालुक्यातील विरोधकांची एकजुट नाही. त्यामुळेचं तालुक्यात विखे सत्तेत आहे. ज्या दिवशी तालुक्यात सक्षम असा राजकीय विरोधी पर्याय निर्माण होईल, तेव्हा विखे तालुक्यातील सर्व सत्तेतुन हद्दपार होतील. त्यासाठी तालुक्यातील सर्व विरोधकांनी एकतेची वज्रमूठ आवळण्याची गरज असल्याचे मत श्रीकांत मापारी यांनी व्यक्त केले.