स.भु.प्रशालेत 'मराठी राजभाषा गौरवदिन' साजरा


विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील बालानगर येथील सरस्वती भुवन प्रशालेत 'मराठी राजभाषा गौरवदिन' (कुसुमाग्रज जयंती) आणि 'राष्ट्रीय विज्ञानदिन'  वैज्ञानिक रांगोळी स्पर्धा, माझा आवडता वैज्ञानिक विषयावर निबंध स्पर्धा, मराठी भाषा गौरवगीते समूह गायन, मराठी व विज्ञान विषय शिक्षकांचा सत्कार विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड, प्रमुख वक्ते संस्कारयाग व प्रसिद्धी विभागप्रमुख पद्माकर वाघरूळकर, प्रमुख पाहुणे राजू शिंदे, नलिनी आमते, सीमा लखमल व आयोजक फेरोज पटेल, राजेभाऊ गायकवाड, वैशाली कुंभकर्ण, सुमेधा साळवे या मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर तसेच डॉ. सी.व्ही.रामण, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

यावेळी मराठी भाषेचे महत्त्व, कुसुमाग्रजांच्या चरित्र तसेच विज्ञानदिनाचे महत्त्व, डॉ. सी.व्ही.रामण यांचे व्यक्तित्व व शोधकार्य यांविषयी सायली गोर्डे, गीता संत, शिवकन्या जाधव, नम्रता लिपाने, शामल गोर्डे, सृष्टी लिपाने, वैष्णवी झिरपे, ज्ञानेश्वरी भालेकर, श्रीराम गोर्डे यांनी मनोगते व्यक्त केली. अमृता बोंबले, रिद्धी, योगिता, गीता संत, सरिता या विद्यार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या विविध कवितांचे गायन केले. सातवी व आठवीतील विद्यार्थिनींनी पारंपरिक वेषभूषेत मराठी भाषा गौरवगीतांवर चित्ताकर्षक समूह नृत्ये केली. प्रमुख वक्ते पद्माकर वाघरूळकर प्रत्येक महाराष्ट्रीयनांनी नेहमी मराठीतूनच भावाभिव्यक्ती केली पाहिजे मग समोरील कोणत्याही भाषेचा असो तसेच श्रद्धा व अंधश्रद्धा यातील फरक ओळखून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगी बाळगण्याचे आवाहन केले. प्रमुख पाहुणे राजू शिंदे यांनी आपली बोली भाषा जपत प्रमाण भाषाही अंगिकारली पाहिजे असे सांगून उत्कृष्ट कार्यक्रम नियोजनाचे तोंड भरून कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात प्रभारी पर्यवेक्षक राजेंद्र गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाची स्तुती केली. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या गोर्डे-गीता संत यांनी तर आभार स्नेहल फडे हीने केले. फलकलेखन कलाशिक्षक प्रदीप ब्राह्मणकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अजय तोटावार, विशाल साबळे, संजय राऊत, राहूल जाधव, राहूल शिंदे, जितेंद्र बुरकुल, बाबासाहेब गोर्डे, सुदाम जाधव यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या