अहमदनगर/ जावेद शेख : श्री. गाडगे महाराज आश्रमशाळा येथे आदिवासी,भटक्या विमुक्त जाती जमातील विद्यार्थी शिक्षण घेतात व ते वसतीगृहात राहातात. सद्या कडाक्याची थंडी पडत आहे. ब-याचशा विद्यार्थ्यांजवळ थंडीपासुन संरक्षण करण्यासाठी उबदार कपडे नव्हते, हे पाहुन वांबोरी येथिल स्व. मोतीलाल बिहाणी यांचे स्मरणार्थ बिहाणी परीवारातर्फे वसतीगृहातील निवासी विद्यार्थ्यांना मायेची उब मिळाली.
या विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. ऐन थंडीत मिळालेल्या या भेटीने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आश्रमशाळेतील मातोश्री सखुबाई सांस्कृतिक हॉल मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखेच्या संचालिका सौ. भारतीताई खिलारी होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गजानन खर्चे यांनी तर सूत्रसंचलन सुदाम दिघे यांनी केले. याप्रसंगी संतश्रेष्ठ गाडगेबाबा यांच्या प्रातिमेचे पुजन होऊन पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित बिहाणी परीवारातील मान्यवरांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.खिलारी, गणेश खांडवे व मुख्याध्यापक खर्चे यांचे हस्ते करण्यात आला. त्यानंतर १०० विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप करण्यात आले. बिहाणी परीवारातर्फे गरजु विद्यार्थ्यांना नेहमीच कपडे, धान्य या स्वरुपात मदत केली जाते.
याप्रसंगी चंद्रभागाबाई बिहाणी, प्रकाश बिहाणी, जवाहरलाल बिहाणी, प्रविण बिहाणी, सत्यनारायण बिहाणी, अधिक्षक अजाबराव गोळे, अधिक्षिका श्रीमती आरती लाड, अधिक्षक शरद मुर्तडक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी किरण पवार यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल बिहाणी परीवाराचे आभार मानले.
0 टिप्पण्या