राहुरीत जनजीवन गारठले, धुक्यामुळे पिकांनाही धोका

राहुरी / बाळकृष्ण भोसले - गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण तसेच काही भागात कमीअधिक प्रमाणात झालेल्या पावसामुळे तालुका अक्षरशः गारठला आहे दिवसभर ठिकठिकाणी शेकोट्या पेटताना दिसल्या तर या वातावरणाचा विपरीत परिणाम पिकांवरही होत असल्याने शेतकरी वर्गातून चिंतेचे वातावरण आहे.

हवामान खात्याने दिलेल्या पुर्वसुचनेनुसार मंगळवार पासून हवामानात बदल झाला असून तालुक्यात काही भागात मंगळवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली तर दिवसभर ढगाळ वातावरण आहे सकाळी कमीअधिक प्रमाणात धुक्याचा प्रभाव होत आहे तर थंड हवेचे झोत दिवसभर टिकून आहेत. या वातावरणाने मानवी जीवन गारठून गेले आहे तर पशुपक्ष्यांनाही याचा चांगलाच फटका बसल्याचे पहावयास मिळत आहे.

प्रचंड गारठ्याने जनजीवन विस्कळीत झाले असून गावे ओस पडल्याचे चित्र सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे.
 प्रशासन कोरोनाचे प्रोटोकॉल पाळण्याचे आवाहन करूनही घराबाहेर पडणारांची संख्या या नैसर्गिक वातावरणाने आपोआप आटोक्यात आणली आहे.

या वातावरणाचा जनजीवनावर परिणाम झाला आहे बरोबरच पिकांनाही याचा मोठा फटका बसत आहे नव्यानेच लागवड झालेल्या कांदा पिकांना धोका होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे तर भाजीपाला, गहू, हरबरा यासारख्या खरिप पिकांवर रोगकीडीचा प्रादुर्भाव होता तो अजून वाढण्याचे संकेत शेतीतज्ञांनी दिले आहेत दिवसेंदिवस होणाऱ्या हवामान बदलाने पिकपध्दतीत बदल करण्याची वेळ सध्या शेतकऱ्यांवर आली असून हंगामानिहाय पिकपध्दत आता या हवामान बदलाने कालबाह्य होत आहे की काय अशी शंका बळीराजा व्यक्त करत आहे. 

गेल्या चार ते पाच वर्षात उशिरा पावसाचे आगमन होत असून थंडीचा मोसमही उशिरा येत आहे पर्यायाने या बदलाचा पारंपरिक पिकपध्दतीवर अनिष्ट परिणाम होत असून उत्पन्नात कमालीची घट होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला नेहमीच सामोरे जावे लागत आहे एकूणच सध्या हवामान बदलाने जनजीवन अक्षरशः गारठले असल्याचे चित्र असून हा बदल आणखी दोन दिवस टिकून राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या