राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे आणि राज्यातील चारही कृषि विद्यापीठे यांच्या संयुक्त विद्यमाने वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ, परभणी येथे दि. 24 ते 30 डिसेंबर, 2021 दरम्यान संयुक्त कृषि संशोधन आणि विकास समितीची 49 वी बैठक काल संपन्न झाली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे यांनी भुषविले. या प्रसंगी राज्याचे कृषि सचिव एकनाथ डवले (भा.प्र.से.), महात्मा फुले कृषि विद्यापीठांचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. व्ही.एम. भाले, परभणी येथील वसंतराव नाईक मराठावाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक श्री. विश्वजीत माने (भा.प्र.से.) ऑनलाईन मोडमध्ये उपस्थित होते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक संशोधन डॉ. शरद गडाख यांचे नेतृत्वाखाली शेतपिके वाण प्रसारण व शेतपिके वाण संरक्षण आणि शेतकरी अधिकारी कायद्यांतर्गत या कृषि विद्यापीठाच्या नवीन वाण आणि तंत्रज्ञान शिफारशी सादर केल्या व त्यास समितीने मान्यता दिली.
या बैठकीत महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे दहा वाण, एक कृषि यंत्रे अवजारे आणि 58 पीक उत्पादन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. कृषी क्षेत्रातील डिजिटल तंत्रज्ञानामध्ये प्रथमच महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तीन शिफारशी शेतकऱ्यांसाठी प्रसारित केल्या आहेत. विविध पिकातील प्रसारित केलेल्या वाणामध्ये ज्वारी-फुले यशोमती, गहू-(फुले अनुपम) एन.आय.ए.डब्ल्यू 3624, सोयाबीन-फुले दुर्वा, उडीद-फुले वसू, तीळ-फुले पुर्णा, ऊस-फुले 11082, करडई-एस.एस.एफ 15-65, एस.एस.एफ 16-02, पेरु-फुले अमृत, चिंच-फुले श्रावणी हे वाण प्रसारीत करण्यात आले. तसेच ट्रॅक्टरचलीत फुले ऑटोमॅटीक पलटी नांगर यंत्र व 58 तंत्रज्ञान शिफारशी प्रसारीत करण्यात आल्या असल्याची माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ.शरद गडाख यांनी दिली.
0 टिप्पण्या