डॉ. अशोक ढवण यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमणूक


राहुरी विद्यापीठ : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कृषी विद्यापीठांचे कुलपती श्री. जिष्णु देव वर्मा यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमणूक केली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी डॉ. अशोक धवन यांचे स्वागत करून अभिनंदन केले.

डॉ. अशोक ढवण यांनी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेतून १९८० साली मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र या विषयात एम. एस्सी. (कृषी) तर पुढे १९८४ साली आचार्य पदवी प्राप्त केली. परभणी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक ते विभाग प्रमुख, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य, विस्तार शिक्षण संचालक व शिक्षण संचालक इ.विविध पदे त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहेत. डॉ. ढवन यांना अध्यापन, विस्तार शिक्षण व संशोधनाचा ३५ वर्षांचा दीर्घ अनुभव आहे. काही दिवस त्यांच्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कुलगुरू पदाचा अतिरिक्त पदभार होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कृषि संशोधनाचे ज्ञान अवगत करण्यासाठी अमेरिकेतील ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी, कॉरवालीस व कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी येथे एफएओ फेलो म्हणून १९९५-९६ मध्ये विविध विद्यापीठे व संशोधन संस्थेमध्ये त्यांना काम करण्याचा चांगला अनुभव प्राप्त झाला. केंद्र शासनाच्या नवी दिल्ली येथील जैवतंत्रज्ञान विभागाच्या अर्थसहाय्याने महिला शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत निर्मिती तंत्रज्ञान प्रशिक्षण प्रकल्प राबविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन पत्रिकांमधून ५० पेक्षा जास्त संशोधनपर लेख प्रकाशित झाले आहेत.

राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरातील विज्ञान विषयक परिषदा, सेमिनार, कार्यशाळा आदीमध्ये सहभागी होऊन ७५ पेक्षा अधिक वेळा संशोधनपर निष्कर्षांचे सादरीकरण व व्याख्याने त्यांनी दिली आहेत. पदव्युत्तर व आचार्य पदवीकरिता २० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे त्यांनी प्रमुख संशोधन मार्गदर्शक म्हणून तर ५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या संशोधन सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून कार्य केले. उल्लेखनीय संशोधन कार्याबद्दल जीकेव्हीके सोसायटी आग्रातर्फे २०१५ मध्ये हैदराबाद येथील राष्ट्रीय कार्यशाळेत विशेष जीवन गौरव पुरस्कराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी विद्यापीठात एक लाखाहून अधिक वृक्ष लागवड झालेली आहे. त्यांनी परभणी कृषी विद्यापीठात स्वच्छ भारत अभियान मोठ्या प्रमाणात राबविले आणि मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला.

मराठवाडा कृषि विद्यापीठात विस्तार शिक्षण संचालक असतांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी 'विद्यापीठ आपल्या दारी-तंत्रज्ञान शेतावरी' हा नाविन्यपूर्ण विस्तार उपक्रम त्यांनी राबविला. राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांचे सहकार्यातून मराठवाड्यात विद्यापीठाच्या वतीने फळपीक अभियान राबविण्यात मोठे योगदान त्यांचे होते. उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात तळ्यातील गाळ काढून हलक्या जमिनीचे पुनर्भरण करण्याचे तंत्रज्ञान त्यांनी विकसित केले.

राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांचे सहकार्यातून मराठवाड्यात विद्यापीठाच्या वतीने फळपीक अभियान राबविण्यात मोठे योगदान त्यांचे होते. त्यांची अभ्यासूवृत्ती व शिक्षण,संशोधन व विस्तारामधील अनुभव बघता माननीय राज्यपाल यांनी त्यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमणूक केली आहे. या नेमणुकीबद्दल विद्यापीठाच्या सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या