डाळिंब संशोधनाला शेतकऱ्यांच्या अनुभवाची नवी दिशा!


सेवा संकल्प अभियान-२०२६ चा महात्मा फुले कृषि विद्यापीठात शुभारंभ; शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादातून संशोधनाचा नवा आराखडा

राहुरी : बदलते हवामान, नवनवीन रोग-किडी, उत्पादनातील चढ-उतार आणि बाजारपेठेतील बदलांमुळे डाळिंब शेतीसमोर सातत्याने नवी आव्हाने उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर डाळिंब बागायतदारांच्या प्रत्यक्ष अनुभवातून त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेऊन आगामी डाळिंब संशोधनाची दिशा निश्चित केली जाईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी केले.

राज्य शासनाच्या सेवा संकल्प अभियान-२०२६ अंतर्गत महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागातील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळ संशोधन प्रकल्पाच्या वतीने आयोजित ‘डाळिंब : शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. या उपक्रमातून राज्यातील प्रगतशील डाळिंब बागायतदार आणि विद्यापीठातील शास्त्रज्ञ यांच्यात थेट, अभ्यासपूर्ण आणि फलदायी संवाद घडून आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. विलास खर्चे होते. यावेळी संचालक संशोधन डॉ. प्रशांत बोडके, संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाने, उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. भरत पाटील, पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुभाष भालेकर, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, कराड कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संग्राम धुमाळ तसेच प्रगतशील डाळिंब बागायतदार ब्रह्मदेव दुधाळ, प्रकाश बाफना, विठ्ठल भोसले आणि संतोष पन्हाळे उपस्थित होते.

‘शेतकऱ्यांच्या बांधावरचे प्रश्न संशोधनातून सुटले पाहिजेत’

कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या शेतावर निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे संशोधनातून मिळाली पाहिजेत. शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यातील संवाद जितका सखोल होईल, तितके संशोधन अधिक परिणामकारक आणि शेतकरीकेंद्रित होईल. या सुसंवादातून मिळणारे प्रत्याभरण विद्यापीठाच्या आगामी संशोधनासाठी अत्यंत मोलाचे ठरणार असून, त्यातून डाळिंब संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने डाळिंब पिकासाठी केलेल्या संशोधनातून ‘भगवा’ आणि ‘फुले सुपर भगवा’ यांसारखे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत. या संशोधन परंपरेला पुढे नेताना शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष अनुभवांचा समावेश करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘भगवा’ आणि ‘फुले सुपर भगवा’ने समृद्धीचा मार्ग दाखविला

प्रगतशील डाळिंब बागायतदार ब्रह्मदेव दुधाळ यांनी विद्यापीठाच्या डाळिंब संशोधनाचे कौतुक केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या भगवा आणि फुले सुपर भगवा या वाणांमुळे अनेक डाळिंब बागायतदारांच्या आर्थिक प्रगतीला चालना मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

बाजारात जैविक खतांना मोठी मागणी असून, त्याबाबत शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाची गरज आहे. त्यामुळे विद्यापीठाने डाळिंब बागायतदारांसाठी जैविक खते तयार करण्याचे विशेष प्रशिक्षण आयोजित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधणारे कुलगुरू आम्ही प्रथमच पाहत आहोत,” असे गौरवोद्गार दुधाळ यांनी काढले.

रोग-किडींपासून निर्यातक्षम उत्पादनापर्यंत मंथन

या सुसंवादामध्ये डाळिंब उत्पादनातील विविध समस्या व आव्हाने, बदलते हवामान, आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनवाढ, फळांची गुणवत्ता, निर्यातक्षम उत्पादन, रोग-किडींचे व्यवस्थापन, जैविक निविष्ठा आणि बाजारपेठेतील बदल अशा विविध विषयांवर शेतकरी व शास्त्रज्ञांमध्ये सखोल चर्चा झाली.

प्रगतशील बागायतदारांनी आपल्या प्रत्यक्ष शेतीतील अनुभव, अडचणी, सूचना आणि अपेक्षा मांडल्या. या चर्चेतून विद्यापीठाच्या आगामी संशोधनासाठी महत्त्वपूर्ण प्रत्याभरण मिळाले. त्यामुळे हा कार्यक्रम केवळ संवाद न राहता ‘शेतकऱ्यांच्या अनुभवातून संशोधनाची दिशा आणि संशोधनातून शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाय’ या संकल्पनेला मूर्त रूप देणारा ठरला.

बागायतदारांचा सन्मान; विद्यापीठाचेही अभिनंदन

सेवा संकल्प अभियान-२०२६ चा शुभारंभ यावेळी करण्यात आला. सहभागी सर्व डाळिंब बागायतदारांचा कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

विद्यापीठाच्या इतिहासात डाळिंब बागायतदारांसोबत अशा प्रकारचा थेट आणि व्यापक सुसंवाद प्रथमच आयोजित झाल्याने उपस्थित बागायतदारांनीही कुलगुरू डॉ. विलास खर्चे तसेच विद्यापीठातील सर्व संचालकांचा एकत्रित सन्मान करून या उपक्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी संचालक संशोधन डॉ. प्रशांत बोडके आणि संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाने यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठातील विविध विभागांचे विभागप्रमुख, उद्यानविद्या विभागातील शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवयी यांनी केले, तर आभार डॉ. जितेंद्र ढेंबरे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या