नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना कृषि निविष्ठांचे वाटप


राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन प्रकल्प आणि डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी उपयोजने अंतर्गत निविष्ठा वाटप कार्यक्रम व शेतकरी मेळावा मौजे श्रावणी, ता. नवापूर, जि. नंदुरबार येथे उत्साहात पार पडला.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांच्या नेतृत्वाखाली तसेच संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके आणि उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नंदुरबार श्री. एस. वाय. पुरी, प्रकल्प संचालक, आत्मा, नंदुरबार दीपक पटेल, सहाय्यक निबंधक, नवापूर सागर गवंड, कृषि विज्ञान केंद्र, नंदुरबारचे प्रमुख डॉ. राजेंद्र दहातोंडे, शास्त्रज्ञ सौ. आरती देशमुख, पीक विशेषज्ञ डॉ. व्ही. आर. गुरवे, श्रावणी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. प्रभा भाईदास कोकणी तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थ संदीप ईश्वर कोकणी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ व ग्रामस्थ उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत श्रावणी गावातील 40 आदिवासी शेतकऱ्यांना प्रत्येकी 25 नग केशर आंब्याची रोपे वितरित करण्यात आली. त्यासोबत प्रत्येकी 2 लिटर फुले सुपर बायोमिक्स, 2 लिटर फुले सूक्ष्म अन्नद्रव्य ग्रेड-2, कृषिदर्शनी 1 नग व सायकल कोळपे 1 नग अशा विविध कृषि निविष्ठांचे वाटप करण्यात आले. यावेळी झालेल्या तांत्रिक मार्गदर्शनात विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी आंबा लागवड, पीक व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, सेंद्रिय निविष्ठांचा प्रभावी वापर तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञान याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

यावेळी आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन फळपिकांच्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन उद्यानविद्यावेत्ता डॉ. सुभाष गायकवाड, रोग शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश मोरे आणि कीटक शास्त्रज्ञ डॉ. अजय हजारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि सहाय्यक दत्तात्रय गायकवाड आणि डाटा ऑपरेटर विलास खिलारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या