यावेळी ह.भ.प. तुकाराम महाराज बनकर (राजुरी) यांचे प्रवचन झाले. प्रवचनात त्यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "देवाला आवडेल अशी भक्ती करा. परमार्थ निस्वार्थ भावनेने व शुद्ध अंतःकरणाने केला तर परमेश्वर त्या भक्ताचा योगक्षेम स्वतः चालवितो. फलाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करत राहिल्यास परमेश्वर योग्य वेळी त्याचे फळ देतो."
पुढे बोलताना त्यांनी शिरसगावच्या आध्यात्मिक परंपरेचा गौरव करत म्हटले की, "बालसंन्यासी हरीबाबांनी उभारलेला अध्यात्माचा दीप योगी माणिकनाथजी महाराज यांच्या रूपाने अधिक तेजस्वी होत आहे. हरीबाबांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व भक्तांनी एकजुटीने सहकार्य करावे."
अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त परिसरातील शेकडो भाविकांनी उपस्थित राहून योगी माणिकनाथजी महाराज यांचा सत्कार केला व त्यांना उदंड आयुष्य व निरोगी आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. भक्तिमय वातावरणात झालेल्या या सोहळ्याने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक ऊर्जा व प्रेरणा दिली.
यावेळी गणेशराव मुदगुले, अशोकराव पवार, भास्करराव ताके, सुरेश मुदगुले, नवनाथ ताके, ज्ञानदेव बकाल, बाळासाहेब बकाल, शांताराम गायकवाड, भागचंद जगताप, सुरेश मुळे, संदीप वाघमारे, उपसरपंच संजय यादव, निलेश यादव आदी मान्यवरांसह बालसंन्यासी हरीबाबा भक्त मंडळ, नाथ भक्त मंडळ, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्यानंतर बाळासाहेब चव्हाण व पोपट दहातोंडे यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला.

0 टिप्पण्या