दुःखाच्या क्षणीही देवावर विश्वास ठेवणे हीच खरी श्रद्धा- महागुरूस्वामी बार्थोल बरेटो


श्रीरामपूर ( बाबासाहेब चेडे ) : तालुक्यातील संत तेरेजा मतमाउली भक्तिस्थान हरेगाव येथे सध्या ईस्टर सणापर्यंत पवित्र आठवडा साजरा करण्यात येणार असून रविवार दि. 29 मार्च रोजी झावळ्यांचा रविवार मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 6:45 वा. हरेगाव डी क्वार्टर येथे नाशिक धर्मप्रांताचे महागुरूस्वामी बार्थोल बरेटो यांच्या हस्ते व प्रमुख धर्मगुरू डॉमनिक, फा.फ्रान्सिस, फा.संतान यांच्या उपस्थितीत विधीवत धार्मिकविधी करून सर्व भाविकांना झावळ्या देण्यात आल्या. त्यानंतर संत तेरेजा चर्चपर्यंत झावळ्या हातात घेऊन भव्य मिरवणूक काढण्यात आली. झावळ्यांचा रविवार हा ईस्टर संडेच्या एक आठवड्यापूर्वी साजरा करण्यात येतो. जेरुसलेम नगरीत येशूचा प्रवेश आणि त्यानंतर मेजवानी तसेच येशूचे बलिदान याची सुरुवात या रविवारने होते. सकाळी 7.30 वा. चर्चमध्ये पवित्र मिस्सा झाला.

यावेळी नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी बार्थोल बरेटो यांनी या रविवारचे महत्व सांगताना प्रतिपादन केले की "आज आपण झावळ्यांचा रविवार मोठ्या भक्तिभावाने साजरा करीत आहोत. हा दिवस आनंद व दुःख या दोन्ही भावनांचा संगम आहे. एका बाजूला आपण यरुशलेममध्ये झालेला विजयी प्रवेश पाहतो. जिथे लोक होसान्नाच्या घोषात त्याचे स्वागत करतात. तर दुसऱ्या बाजूला काही दिवसातच त्याच प्रभू येशूला क्रुसावर खिळवले जाते आणि तीच गर्दी येशूला क्रुसावर खिळा असे ओरडताना दिसते. ही घटना आपल्या मनाला योग्य वाटत नाही. आपल्याला स्वतःला विचारण्यास भाग पाडते. आपली श्रद्धा खरोखर दृढ आहे का ? की ती परिस्थितीनुसार बदलणारी आहे ? येशूचा यरुशलेममध्ये प्रवेश हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नाही तर तो आपल्या जीवनातील एक जिवंत संदेश आहे. तो आपल्याला शिकवतो की खरे महानत्व हे सत्तेत किंवा शक्तीत नसून नम्रतेत आणि सेवाभावात असते. आपल्या जीवनात जेव्हा अडचणी संकटे किंवा दुःख येते तेव्हा आपण अनेकदा खचतो, तक्रार करतो, देवावर रागावतो परंतु आजचा संदेश आपल्याला शिकवतो की दुःखाच्या क्षणीही देवावर विश्वास ठेवणे हीच खरी श्रद्धा आहे. देव कधीही आपल्याला सोडत नाही उलट तो आपल्या दुःखात आपल्याला अधिक जवळून साथ देतो "

दि. 2 एप्रिल रोजी आज्ञा गुरुवार असून प्रमुख याजक रे फा.डॉमनिक रोझारिओ, प्रवचनकार फा अँड्र्यू जाधव, रात्री 8 वा.पवित्र साक्रामेंट स्थलांतर व साक्रामेंट भक्ती होणार आहे. सर्वानी त्यास सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या