क्रांतीदिनी दिल्लीत पेन्शनधारकांचे देशव्यापी सत्याग्रह आंदोलन- पोखरकर

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : येत्या ऑगस्ट महिन्यात इपीएस पेन्शनधारकांच्या प्रश्नी नवी दिल्लीत रामलीला मैदानावर राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम भारत संघटक सुभाष पोखरकर यांनी श्रीरामपूर येथे बैठकीत दिली.

एक महिन्याच्या आत केंद्र सरकारने इपीएस ९५ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ केली नाही तर ९ ऑगस्ट क्रांतीदिनी दिल्लीमध्ये दोन लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. अनेक आंदोलने केल्यानंतर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पेन्शनधारकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या प्रश्नी लक्ष घालावे म्हणून खासदार यांचे मार्फत पाठविलेल्या निवेदनावर महिला पुरुष कामगारांनी स्वत:च्या रक्ताचे आंगठे देऊन अनोखे आंदोलन केले. देशात औद्योगिक सार्वजनिक, सहकारी व इतर उद्योग क्षेत्रात ६७ लाख कामगारांनी इपीएस फंडात ४१७, ५४१, १२५० रु असे अंशदान दिले आहे. त्यांना सेवानिवृत्तीनंतर त्यावर तुटपुंजे असे पेन्शन मिळत आहे. त्यात घरखर्च भागत नाही.

पेन्शनवाढीसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती ६ वर्षापासून लढा देत आहे. खा.हेमा मालिनी यांच्या समवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेबरोबर दोन वेळा सविस्तर चर्चा होऊन समितीने पेन्शनवाढ कशी योग्य आहे हे पटवून दिले. त्यावर पंतप्रधान यांनी पेन्शनवाढीचे निर्देश मंत्र्यांना दिले. त्यानुसार बैठक होऊन त्यांनी देखील वाढ देण्यास हरकत नसल्याचे सांगितले. अद्याप कोणताही निर्णय झाला नाही अधिवेशन १२ जुलैपर्यंत राहील. दरमहा रु ७५००/- अधिक महागाई भत्ता अशी पेन्शन मिळावी, वृद्ध पतीपत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी आदी मागण्या आहेत. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी. त्यासाठी संसदेत बिल पास करावे अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यातून एक हजार पेन्शनधारक सहभागी होणार आहेत. या आंदोलनात जास्तीत जास्त पेन्शन धारकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सर्व जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, पदाधिकारी यांनी केले आहे. आंदोलनासाठी ४ ते ५ दिवस लागणार असल्याने व रेल्वेत जागा मिळण्यासाठी त्वरित आरक्षण करून घ्यावे. ७ ऑगस्टला दिल्लीत पोहोचणे व मागण्या मान्य होईपर्यंत ४ ते ५ दिवस मुक्काम धरून दि ११ व १२ चे परतीचे आरक्षण काढून घ्यावे. दररोज सकाळी गोवा, दुपारी कर्नाटक व रात्री झेलम एक्स्प्रेस आहे. दि ६ रोजी शिर्डीहून कालका एक्स्प्रेस आहे. त्याप्रमाणे आरक्षण घ्यावे अशा सूचना सुभाष पोखरकर व सहकारी यांनी दिल्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या