राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. सुनिल गोरंटीवार यांना (दि. 1 जुलै) कृषि दिनी मुंबई येथे नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात वसंतराव नाईक कृषि पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 109 व्या जन्मदिनानिमित्त सदरील पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सदरचा पुरस्कार दक्षिण आशिया जैविक तंत्रज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांच्या हस्ते देण्यात आला. पुरस्कार वितरण प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, कोषाध्यक्ष डॉ. बकुळ पटेल यावेळी उपस्थित होते.
डॉ. गोरंटीवार हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख म्हणुन कार्यरत असून जागतिक बँक अर्थसहाय्यीत कास्ट प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक म्हणुन ते काम पहात आहेत. डॉ. गोरंटीवार यांनी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर आपली सेवा सुरु केली असून त्यांच्या 38 वर्षाच्या सेवेत त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी इंग्लड मधील लॉफबरो विद्यापीठातून 1996 साली आचार्य पदवी व 2002 साली पदव्युत्तर आचार्य पदवी मिळविली आहे. याच विद्यापीठात त्यांनी व्हीजिटींग फॅकल्टी म्हणुन काम पाहिले. त्यांनी आत्तापर्यंत 7 आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रकल्प पूर्ण केले असून 4 प्रकल्पामध्ये सध्या काम सुरु आहे. त्यांचे आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमध्ये 30 शोध निबंध, राष्ट्रीय नियतकालीकांमध्ये 123 शोध निबंध प्रकाशीत झालेले आहेत. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिसंवादात 100 पेक्षा जास्त संशोधन पेपरांचे सादरीकरण केले आहे. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर 6 पुस्तके व राष्ट्रीय स्तरावर 12 पुस्तके प्रकाशीत झालेली आहे. तसेच त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध समित्यांमध्ये महत्वाच्या पदावर काम केले आहे.
एप्रिल 2020 च्या लॉकडाऊनमध्ये कार्यालये बंद असल्यामुळे निर्बंध असल्याने डॉ. गोरंटीवार यांनी ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी इलनिंग मॉडेल तयार करुन 180 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय प्रशिक्षणे, कार्याशाळा, व्याख्याने यांचे आयोजन या मॉडेलच्या माध्यमातून केले. याचा लाभ 60000 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरावरील विविध शिक्षक संस्थामधील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शेतकरी वर्गांनी लाभ घेतला. तसेच कास्ट प्रकल्पांतर्गत विकसीत केलेल्या विविध नाविन्यपूर्व डिजीटल तंत्रज्ञानामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. डॉ. गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या ड्रोन, रोबोटीक्स, आयओटी आणि हायपरस्पेक्ट्रल प्रयोगशाळा विकसीत करण्यात आल्या. तसेच विविध नाविण्यपूर्ण डिजीटल तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकर्यांपर्यंत करुन हवामान अद्ययावत डिजीटल गावे या संकल्पनेसाठी कास्ट प्रकल्पांतर्गत 11 गावे दत्तक घेतली आहेत.
नुकतीच भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे स्थापन केलेल्या ड्रोन संबंधीत कमीटीवर त्यांची सदस्य म्हणुन भारत सरकारने नेमणूक केली आहे. डॉ. सुनिल गोरंटीवार यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव प्रमोद लहाळे आणि नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या