अहमदनगर/ जावेद शेख : सन 2021 च्या खरीप हंगामात माहे जून ते नोव्हेंबरपर्यंत सतत बदलणारे ढगाळ वातावरण, कमी अधिक तापमान, अवेळी पडणार्या पाऊसामुळे वाढलेली आर्द्रता या सर्व कारणामुळे एरिडोफाईड माईटचा झालेला प्रादुर्भाव व यामुळे वांझ रोगाचा प्रादुर्भाव वाढून तूरीला कमी फुले व शेंगा लागलेल्या आहेत.
सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील जालीहाळ बु., संख, पांडोझरी व गिरगाव येथील तुरीच्या पिकाला कमी प्रमाणात फुले व शेंगा लागलेल्या असल्याबाबतची तक्रार कृषी विद्यापीठाला प्राप्त झालेली होती. त्या अनुषंगाने वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय अमोलिक, कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे, तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ आणि तूर रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी संबंधीत शेतकर्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन रोगग्रस्त तुरीच्या प्लॅाटची पाहणी केली.
याप्रसंगी डॉ. चांगदेव वायळ यांनी तुरीवरील किडींच्या नियंत्रणाबाबत तर डॉ. विश्वास चव्हाण यांनी तुरीवरील रोगांच्या नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी एस. एम. सातपुते, तालुका कृषी अधिकारी, जत, एस. के. थोरात, मंडळ कृषी अधिकारी, माडग्याळ, एल. ए. लांडगे, मंडळ कृषी अधिकारी, उमदी, बी. टी. नागणे, कृषी पर्यवेक्षक, श्रीमती. व्हि. के. राठोड, कृषी सहाय्यक तसेच शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शास्त्रज्ञांनी सांगितले की तुरीवरील वांझ रोग हा पीजन पी स्टरिलीटी मोझॅक व्हायरस (वांझ रोग) या विषाणूमुळे होतो. एरिडोफाईड माईट नावाच्या कोळीद्वारे वांझ रोगाचे विषाणू हे रोगग्रस्त झाडापासून इतर झाडांवर प्रसारीत होतात. विषाणूच्या प्रादुर्भावामुळे तुरीच्या पानांवर गोलाकार पिवळे ठिपके पडतात तसेच पिवळसर हिरवट चटटेही पानांवर दिसतात. तुरीच्या झाडांची वाढ खुंटते तसेच वांझ रोगामुळे तूरीच्या झाडांना फुले व शेंगा लागत नाही. वांझ रोगाचा प्रादुर्भाव हा पेरणीनंतर 45 ते 60 दिवसांच्या आत झाल्यास पिकाचे शंभर टक्के नुकसान होण्याची शक्यता असते. पानांवर पिवळसर हिरवट पटटे/पानांवर गोलाकार पिवळे ठिपके, खुंटलेले तुरीचे झाड-वांझ रोगामुळे फुल व फळधारणा होत नाही.
या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी शेतकरी बांधवांना तूरीचा खोडवा घेवू नये. पीजन पी स्टरिलीटी मोझॅक व्हायरस (वांझ रोग) या रोगाला बळी पडणार्या वाणांची लागवड ऊस पिकाजवळ, पाझर तलाव, शेततळे, ओढा व नदीजवळ तसेच दाट झाडी असलेल्या जागेजवळ आणि खोलगट भागात करण्याचे टाळावे. एरिडोफाईड माईट नावाच्या कोळीचा प्रादुर्भाव वाढू नये या करीता डायकोफॅाल 18.5 ई.सी.2.0 मिली/ लिटर पाणी किंवा पाण्यात विरघळणारे गंधक (सल्फर) 80 डब्ल्यू.डी.जी. 2.5 ग्रॅम/लिटर पाणी किंवा फेनाझाक्वीन 10 ई.सी.1.0 मि.ली./लिटर पाणी या प्रमाणे तूर 20 दिवसांची असतांना व 45 दिवसांची असतांना फवारणी करावी. वांझ रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट टाकावीत.
वांझ रोग प्रतिकारक वाण जसे की, बी. एस. एम. आर. 736, बी. एस. एम. आर. 853, बी. डी. एन.-711, गोदावरी व बी. डी. एन.-716 यासारख्या वाणांची लागवड करावी. तूर पिकाचा खोडवा घेवू नये तसेच मागील हंगामातील शेतात व बांधावर असलेली तुरीची झाडे काढून टाकावीत. आय. सी. पी. 8863 (मारुती) यासारखे वाण वांझ रोगास सहज बळी पडत असल्यामुळे या वाणाची लागवड करु नये. दहा वर्षाच्या आतीलच तुरीच्या सुधारीत वाणांची लागवड करावी.
0 टिप्पण्या