मुले लहान असताना पतीचे निधन झाले. घरातील कमावता व्यक्ती गेल्याने घरातील सर्व जबाबदारी आई प्रयागाबाई बाबूराव आनंदकर यांच्यावर होती. पतीच्या निधनानंतर खचून न जाता मोठ्या हिमतीने त्यांनी मोलमजुरी करून मुलांचे संगोपन केले. चांगले शिक्षण दिले. मुलाला प्राध्यापक बनवले. मुलगा अर्जुन आनंदकर हा सध्या श्रीरामपूर येथील बोरावके काॅलेजात प्राध्यापक म्हणून नौकरी करतो. त्याला दरमहा सव्वा लाख रुपये वेतन मिळते. तरीदेखील आईला सांभाळत नसल्यामुळे उदरनिर्वाह भागविण्यासाठी आईने पैठण न्यायालयात अॅड.विजय मुळे, अॅड.सचिन पाटील, अॅड ए.ए. राका यांच्यामार्फत पोटगीसाठी दावा दाखल केला.
सुनावणी दरम्यान वकीलांनी सव्वा लाख रुपये वेतन असून देखील मुलगा आईला सांभाळत नाही. एवढेच नाहीतर या मुलाने आईच्या नावावर असलेली चार एकर जमीन स्वतः च्या नावे बनावट बक्षीसपत्र बनवून आईची दिशाभूल करुन नावावर करुन घेत जमीन विकून टाकली. पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलाला लहानाचे मोठे केले. चांगले शिक्षण दिले. तोच आता वृद्धापकाळात आधार बनेल अशी आशा बाळगून असणाऱ्या आईची पालनपोषणाची जबाबदारी झटकावून आईला उघड्यावर सोडले. असे त्यांच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. याप्रकरणी न्यायाधीश एस वाघ यांनी सर्व प्रकरणाचे अवलोकन करून प्राध्यापक मुलाला प्रतीमाह सात हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश दिला आहे.
0 टिप्पण्या