शेवगाव/ प्रविण भिसे : मराठा समाजाचे मोर्चे निघूनही सर्व प्रश्न ऐरणीवर पडलेले आहेत. मराठा समाजातील बेरोजगारी कमी करण्याचा मुख्य प्रश्न स्वाभिमानी मराठा महासंघाने हातात घेतलेला आहे. मराठा समाजाच्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन संघटना वाटचाल करत आहे. त्यामुळे स्वाभिमानी मराठा महासंघ मराठा तरुणांचे प्रश्न सोडवणारी संघटना आहे असे मत स्वाभिमानी मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अंकुश डांभे यांनी व्यक्त केले.
स्वाभिमानी मराठा महासंघाचे पाथर्डी तालुका कार्याध्यक्षपदी रमेश शेळके यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली त्याप्रसंगी श्री डांभे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले हे होते. या कार्यक्रम प्रसंगी स्वाभिमानी मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल म्हस्के, युवा नेते बंडू अकोलकर, सुनील उगले, संजय अकोलकर उपस्थित होतेे. रमेश शेळके यांना निवडीचे पत्र स्वाभिमानी मराठा महासंघाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख अमोल म्हस्के यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले म्हणाले की संघटना लवकरच राज्यामध्ये मराठा जोडो अभियान राबवणार आहे. या माध्यमातून सभासद नोंदणी करून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जास्तीत जास्त तरुण संघटनेमध्ये सहभागी करून घेणार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा संघटना वेळोवेळी आंदोलने, मेळावे घेऊन जनजागृती करणार आहे.
0 टिप्पण्या