◾जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून मागणी
विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्याला कायम स्वरूपी तहसीलदार नसल्याने प्रशासकीय कारभार राम भरोसे सुरू आहे. यामुळे नागरिकांची अनेक कामे खोळंबली असून एका दिवसाच्या कामांसाठी पंधरा-वीस दिवस ताटकळत बसावे लागत आहे. हि गैरसोय लक्षात घेऊन तात्काळ एका कायमस्वरूपी तहसीलदाराची नेमणुक करावी अशी मागणी नुकतीच राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या अनिता वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपूर्वी पैठणचे तहसिलदार लाचलुचपत विभागाच्या प्रतिबंधाच्या जाळ्यात अडकले आहेत व त्यांची चौकशी चालू आहे. ते सध्या जामिनावर असून त्यांचा अहवाल राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे. या दरम्यान पैठण तहसील कार्यालयात काही दिवसा पासून कायमस्वरूपी तहसीलदार नसल्याने कार्यालयात प्रचंड प्रमाणात अनागोंदी कारभार चालू आहे. सर्व भार तेथील नायब तहसीलदार, लिपिक, पेशकार आणि अव्वल कारकुन यांच्यावर आलेला असून यामुळे जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. याचा गैरफायदा उचलत मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कामात अफरातफर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन तातडीने कायमस्वरूपी तहसिलदार नियुक्त करावा अशी मागणी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या अनिता पाटील वानखेडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
0 टिप्पण्या