ब्राम्हणी-चेडगाव परिसरात दरोडा घालणारे दोघे स्थानिक; तरवडे कुटुंबाला मारहाण, एक जण जखमी

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी-चेडगाव रस्त्यावरील तरवडे वस्तीवर मध्यरात्री एक ते दीडच्या सुमारास अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील रोख रक्कम सुमारे २० हजार व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेले. दुध डेअरीचे पेमेंट घरात आणून ठेवले हा दरोडा पाळत ठेवून टाकला असुन दरोडा टाकणारे दोघे स्थानिक असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असुन त्या दोघांचा शोध पोलिस घेत आहेत.

रात्री एक-दीडच्या सुमारास रावसाहेब बापू तरवडे यांच्या घरी चोरटे आले. दरम्यान अगोदर त्यांनी रावसाहेब मुलगा मनोज तरवडे यांच्या खोलीची बाहेरून कडी लावून घेतली.त्यानंतर रावसाहेब तरवडे व त्यांच्या पत्नी यांच्या खोलीत शिरले. गाढ झोपेत असतानाच चोरट्यांनी रावसाहेब तरवडे यांना मारहाण करत घरातील रोख रक्कम व त्यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने हिस्कावले. आरडाओरडा ऐकून मनोज तरवडे यांना जाग आली. मात्र, घराची बाहेरून कडी लावल्याचे समजताच त्यांनी शेजारी राहणारे चुलत भाऊ, चुलते यांना फोन करून चोरट्यांची माहिती दिली. शेजारील लोक काही वेळात बाहेर आले. मनोज तरवडे यांनी शेजारील लोकांना फोन लावल्याचे लक्षात येताच त्या दोघा चोरट्यांनी सावध पवित्रा घेत काढला पाय घेतला.

मनोज तरवडे व त्यांच्यासह चुलत बंधू, चुलते व शेजारी राहणाऱ्या तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेडगावच्या दिशेने पळालेले चोरटे पकडले जाण्याच्या धास्तीने काही अंतरावरच ऊसात शिरले. घटनेची माहिती समजताच एकत्रित आलेल्या तरुणांनी परिसर पिंजून काढला. दरम्यान मुळा धरणाच्या उजव्या कॅनल लगत त्यांना एक दुचाकी आढळून आली. मात्र सदर गाडीचा नंबर संशयास्पद व चुकीचा वाटत असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस स्टेशन, वांबोरी पोलीस दूरक्षेत्र व नगर येथील पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. राहुरी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक  तुषार धाकवार यांच्यासह सहकारी पोलीस घटनास्थळी आहेत.

चोरट्यांच्या मारहाणीत जखमी झालेले रावसाहेब बापू तरवडे यांना नगर मधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून श्वानपथक व ठसे तज्ञ पथक घटनास्थळी येवून घरातील वस्तुवरील ठसे घेण्यात आले. श्वान पथकास चोरांनी हुलकावणी दिली. तरवडे यांचे दुध संकलन केंद्र असुन दुधाचे पगार करण्यासाठी बँकेतुन काल पैसे काढले होते. तेव्हाच त्यांच्यावर पाळत ठेवली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरोडा घालणारे दोघे गावातीलच असल्याचे पोलिसांना माहिती समजली असुन त्या दोघांचा पोलिस शोध घेत आहे. त्या दोघांच्या घराची झडती हि पोलिसांनी घेतली आहे. परंतू  ते राञी पासुन घरी आलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांना समजली आहे.

रात्रीच्या या घटनेने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून पोलीस प्रशासनाने सदर घटना गांभीर्याने घेवून चोरट्यांचा शोध घ्यावा. अशी मागणी ब्राम्हणी-चेडगाव परिसरातील नागरिकांमधून  होत आहे. घटनास्थळी अप्पर पोलिस अधिक्षक दिपाली काळे, पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके, पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे आदींनी भेट दिली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या