ढगाळ हवामानामुळे पिकांबरोबर मानवी जनजीवनही विस्कळीत, तुरीला किडींचा वाढला धोका

राहुरी / बाळकृष्ण भोसले : सध्या निसर्गाने वेगवेगळ्या ऋतुत आपले रुप बदलले असून या वातावरणीय बदलांचा परिणाम पिकांबरोबर मानवी जीवनावरही झाला असून भाजीपाला तसेच अन्य पिकांवर रोगकीडींचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे तर या हवामानाचा मानवी जीवनावरही परिणाम होत आहे. विविध आजारांचे आगमन हवामान बदल आपल्यासोबत घेऊन आला असल्याने दवाखान्यांमधून रुग्णांची गर्दी दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोना बरोबर मानव जगत असताना कोरोना दिवसेंदिवस आपले रुप बदलत आहे. आता ओमिक्रानचे रुपात कोरोना दाखल झाला आहे. त्यात शेतमालाच्या दरात घसरण झाल्याने शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळलाा. मात्र वातावरणीय बदलामुळे भाजीपाला पिकावर रोगकीडीचा प्रादुर्भाव दिसत आहेे, दुसरीकडे कांदा रोपांवरही ढगाळ हवामान, धुक्यामुळे धोका निर्माण झाला आहे.

खरीप हंगामातील शेवटचे समजले जाणारे व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळवून देणारे तुरीचे पीक सध्या शेतात आहे. पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीपासून शेतकऱ्यांनी आपले तूरीचे पीक वाचवले आहे. मात्र आता हे पीक अंतिम टप्प्यात असताना मागील ५ ते ६ दिवसापासून सततचे झालेले ढगाळ वातावरण व त्यात झालेला अवकाळी पाऊस याचा फटका तूर उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. सध्याच्या परिस्थितीत तूर पिकावर विविध प्रकारच्या कीडरोगाने बस्तान बसविले आहे.

तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात विशेषतः डोंगरभागात जिरायती क्षेत्रात तूर पिकाची लागवड अधिक प्रमाणात होते. बागायती क्षेत्राच्या मानाने कमी क्षेत्र असले तरी मात्र यंदा निसर्गाच्या अवकृपेने कपाशी, सोयाबीन सह तूर पिकालाही सुरुवातीपासूनच अस्मानी संकटाला सामोरे जावं लागले आहे. कपाशी खालोखाल अधिक उत्पन्न देणारे पिक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. खरीपातील सर्वात शेवटचे पीक म्हणून तर रब्बीत याचा खोडवाही काही शेतकरी ठेवतात.

परंतु उत्पन्न देणाऱ्या नि आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या या पिकावर खराब हवामानामुळे किडरोगाने ग्रासले आहे. अंतिम टप्प्यात असलेल्या या पिकावर शेंगा पोखरणारी अळी बरोबरच शेंगमाशीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होणार असून पुन्हा एकदा शेतकऱ्याला या नव्या संकटाला तोंड देण्याची वेळ आली आहे.

तज्ञांच्या मतानुसार सततच्या ढगाळ वातावरणामध्ये तूरीवर शेंगा पोखरणा-या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. तसेच शेंगमाशीचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास तुरीमध्ये अडकण होऊ शकते.यासाठी शेतकरी बांधवांनी शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या (हेलिकोवर्पा) बंदोबस्ताकरीता पुर्ण वाढ झालेल्या अळ्या वेचून नष्ट कराव्यात. हेलिकोवर्पा अळीची आर्थिक नुकसानीची पातळी कळण्याकरिता प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत.

शेतामध्ये इंग्रजी ” T ” आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत जेणेकरून पक्षाद्वारे अळ्या वेचून खाल्याने प्रादुर्भाव कमी होईल. तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलवावे आणि पोत्यावर पडलेल्या अळ्या वेळोवेळी जमा करून नष्ट करण्याचे आवाहन शेतीतज्ञांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या