डॉ.भागवत यांचे बाल रुग्णालय शटरचे कुलूप तोडले...
राहुरी शहर/ अशोक मंडलिक : राहुरी येथे गेल्या तीन वर्षांपासून बालरोग व नवजात शिशु तज्ञा डॉ.शिल्पा भागवत व डॉ.कौस्तुभ भागवत यांचे डॉ.भागवत चिल्ड्रन हॉस्पिटल या नावाने पाण्याच्या टाकी जवळ दवाखाना आहे. बुधवारच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी डॉ.भागवत यांच्या दवाखान्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सामानाची उचकापाचक करून काही रोख रक्कम नेवून पोबारा केला आहे. गेल्या दीड वर्षापूर्वी याच ठिकाणी चोरांनी डल्ला मारला होता. अद्याप त्याच चोरीचा तपास लागलेला नसतांना पुन्हा चोरी झाल्यामुळे डॉक्टर दामपत्याकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी डॉ.शिल्पा भागवत म्हणाल्या की सातत्याने आमचे हॉस्पिटलचे शटर अज्ञात चोरटे तोडत आहेत. या कृत्या मागे कोण आहे याचा तपास पोलिस प्रशासनाकडून होणे गरजेचे आहे. सध्या आम्ही स्वतःला पूर्णपणे असुरक्षित समजत आहोत. मी स्वत: लहान मुलांची डॉक्टर आहे. कधी कधी रात्री-अपरात्री लहान बाळावर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला घरून यावे लागते. सध्या शहरात वाढत्या चोऱ्या लक्षात घेता, रात्री एखादे बाल रुग्ण आलेच तर हॉस्पिटलला यायची देखील भीती वाटते. रुग्ण सेवा म्हणजेच ईश्वर सेवा मानून आम्ही काम करत आहोत. परंतु चोरांच्या भीती मुळे आम्हाला आमचे काम करणे देखील मुश्कील झाले आहे. चोरीच्या ठिकाणी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, अनिल भट्टड, देवेंद्र लांबे यांनी भेट दिली आहे.
याप्रसंगी प्रकाश पारख यांनी राहुरी शहर तथा तालुक्यात वाढत्या चोऱ्यांविषयी मोठी चिंता व्यक्त केली. या प्रसंगी ते म्हणाले की वाढत्या चोऱ्यांमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस अधिकाऱ्यांकडून ठोस पाऊले न उचलल्या मुळे सातत्याने चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. पोलिस महानिरीक्षक शेखर साहेब व पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांच्या बरोबर पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. पत्राची दखल घेवून अधिकारी व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. लवकरच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची वेळ घेवून व्यापारी असोसिएशन कमिटी सदस्य वाढत्या चोऱ्या, गुन्हेगारी, वाहन पार्किंग अशा अनेक विषयांवर चर्चा केली जाणार आहे.
0 टिप्पण्या