राहुरी शहर / अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील मृदशास्त्रज्ञ डॉ. अनिल दुरगुडे यांना मृदगंध-2020 पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील भारतीय मृदविज्ञान संस्था, नवी दिल्ली-परभणी शाखा यांच्या वतीने डॉ. दुरगुडे यानी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सदरचा पुरस्कार दिला. डॉ. दुरगुडे यांनी माती परिक्षणाद्वारे शेतकर्यांमध्ये जमिनीच्या आरोग्याविषयी जनजागृती मोहिम राबविली. त्यांचे आत्तापर्यंत 65 संशोधनपर लेख, 11 पुस्तके, 96 आकाशवाणी कार्यक्रम, दुरदर्शनवरील कृषि विषयक 25 कार्यक्रम, शेतकर्यांसाठी 16 शिफारशी, एम.एस्सीच्या 22 व पी.एचडीच्या 10 विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
विद्यापीठात संशोधन करत असतांना त्यांनी 9 प्रकल्पासह 50 उत्पादन चाचण्या व फुले द्रवरुप सूक्ष्मग्रेड-II चे शेतकर्यांसाठी व्यापारी तत्वावर उत्पादन करुन 4 कोटी रुपयांचे महसूली उत्पादनात योगदान दिलेले आहे. आतापर्यंत त्यांना वेगवेगळ्या 10 पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले आहे. अशाप्रकारे त्यांनी 33 वर्षांच्या सेवेतील केलेल्या कार्याबद्दल मृदगंध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. सदरचा पुरस्कार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठात झालेल्या चर्चासत्राच्या कार्यक्रमात कुलगुरु डॉ. संजय सावंत यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
0 टिप्पण्या