श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : माणसाचे सत्कृत्यच जगाला जडवीत, घडवीत असतात, त्यासाठी सत्कार्याला बळ देणारे पुरस्कार हे मानवी संस्कृतीतील प्रेरणात्मक प्रतीक आहेत असे विचार ॲड रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये यांना शब्दगन्ध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य शाखा श्रीरामपूर व लोकरंग बहु उद्देशीय संस्था वडाळा महादेव करिअर कॉम्पुटर श्रीरामपूर यांनी आयोजित राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथीनिमित्त होणाऱ्या सोहळ्यात 'जीवन गौरव पुरस्कार डॉ. बाबुराव उपाध्ये यांना घोषित केला, त्याबद्दल प्राचार्य शेळके सन्मान करताना बोलत होते.
यावेळी सेवानिवृत्त प्रा. शिवाजीराव बारगळ, सागर राजभोग उपस्थित होते. प्राचार्य शेळके यांनी डॉ. उपाध्ये यांच्या 1978 पासूनच्या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक केले. डॉ.उपाध्ये हे 1967 पासून म्हणजे बालपणापासून श्रीरामपूर शहरात वास्तव्य करीत आहेत. पोरक्या अवस्थेत त्यांची येथे जडणघडण झाली, त्यांना मिळालेला नगरपरिषदेचा 'श्रीरामपूर भूषण पुरस्कार जसा कौतुकास्पद आहे तसा ग्रामीण भागाचा जीवन गौरव पुरस्कार भूषणावह असल्याचे सांगून शब्दगन्ध शाखा अध्यक्ष शेख मीरबक्ष बागवान, सचिव कवी आनंदा साळवे, करिअर कॉम्पुटरचे शेख रफिक बागवान यांचे अभिनंदन व धन्यवाद व्यक्त केले.
प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी डॉ.उपाध्ये यांनी श्रीरामपूरची वाचन संस्कृती श्रीमंत करण्यात दिलेले, देत असलेले योगदान प्रेरणादायी आहे असे सांगितले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतातून आपली निवड आणि सत्कार याबद्दल मनोगत व्यक्त केले. सागर राजभोज यांनी आभार मानले.
0 टिप्पण्या