देवळाली प्रवरा /प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे सलग दोन दिवस धाडसी चोऱ्या झाल्या. त्या चोऱ्यांचा तपास लागत नाही. तोच चोरट्यांनी राहुरी शहराकडे आपला मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. रविवारी मध्यरात्री दोन अज्ञात चोरट्यांनी राहुरी शहरातील भर पेठेत असलेले दारूचे दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि लाखों रूपयांची रोख रक्कम पळवून नेली. राहुरी पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात दहशत पसरली आहे.
राहुरी येथिल मनप्रितसिंग कथुरिया यांचे शहरातील नवीपेठ भागात मोटवाणी वाईन्स नावाचे दारूचे दुकान आहे. रविवारी रात्री मनप्रितसिंग कथुरिया हे नेहमी प्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. मध्यरात्री अडीच वाजे दरम्यान दोघां चोरट्यांनी शटरचे दोन्ही कुलूप तोडले. यावेळी एका चोरट्याने दुकानात प्रवेश केला तर एकजण बाहेर थांबला होता. दुकानात शिरलेल्या चोरट्याने दुकानाची उचकापाचक केली. यावेळी ड्राव्हर मधील सुमारे सहा लाख रूपयांची रोख रक्कम चोरट्यांच्या हाथी लागल्यामुळे चोरट्यांना मोठे घबाड मिळाले आहे. सहा लाखाची रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. दुकानातील सी.सी. टिव्हीत एक चोरटा कैद झाला आहे.
कथुरिया हे नेहमी प्रमाणे सकाळी दुकान उघडण्यासाठी आले. तेव्हा दुकानात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यावेळी राहुरीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलिस उप निरीक्षक मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार पोपट कटारे, पोलिस नाईक शहामद शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यानूसार सहाय्यक फौजदार रवींद्र विरकर हे मिश्का नामक श्वानाला घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मिश्का नामक श्वान जागेवरच घुटमळले. त्यामुळे कोणताही सुगावा लागला नाही. चोरटे दुकाना समोरुनच वाहनातून पसार झाले असावे असा अंदाज वर्तविला जात आहे.
मनप्रितसिंग जसविंदर कथुरिया वय २४ वर्षे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांत दोन अज्ञात चोरट्यां विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मात्र या घटनेमुळेराहुरी पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे. शहरातील व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांची राञी गस्त संशयाच्या भोवऱ्यात सापली आहे.
0 टिप्पण्या