समाजकारणातील महामेरू, कै.चांगदेव एकनाथ गोडसे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त...!

स्वराज्यसंकल्पभूमी पेमगिरीच्या सामाजिक कार्यात गेली अनेक वर्षांपासून कै.चांगदेव एकनाथ गोडसे यांची महत्वाची भूमिका होती. गावातील कोणताही प्रश्न असो तो नेहमीच निर्भीड व रोखठोकपणे मांडणं हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष गुण होता. पोटात एक आणि ओठात एक या पद्धतीचा त्यांनी कधीच अवलंब केला नाही जे आहे ते सडेतोड, स्पष्टपणे समोरासमोर विचार मांडायचे मग समोरच्या व्यक्तीला राग येईल म्हणून त्यांनी आपल्या विचारांशी कधी तडजोड केली नाही.

पेमगिरीतील पतसंस्थेच चेअरमनपद असेल, सहकारी सोसायटीचं चेअरमनपद असेल वा तंटामुक्तीचं अध्यक्षपद असेल या सर्व पदांची जबाबदारी त्यांनी लीलया पार पाडली. संपूर्ण गाव त्यांना चांगदेव मामा या नावानेच ओळखतं होतं. हिच खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणावी लागेल. वर्षातील असा एकही दिवस नसेल कि ज्या दिवशी गावातील कोणी प्रमुख मंडळी असतील वा बाहेरील पाहुणेमंडळी असतील चांगदेव मामांच्या वस्तीवर दररोज लोकांची हमखास वर्दळ असायची. त्यांचा व गावातील नागरिकांचा विशेष स्नेह होता. संपूर्ण गावावर त्यांचा विशेष प्रभाव (वचक )होता. बहुतेक किचकट प्रश्न मामांकडे आले कि ते मार्गी लागायचेच याची अनेक उदाहरणं आहेत.

साधं राहणीमान व उच्च विचार, तसेच मोठेपणाचाही त्यांनी कधी आव आणला नाही. हे तत्व त्यांनी अखेरपर्यंत जपलं. गावातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनी कुटुंबाकडेही कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. शेतीबरोबरच दुग्धव्यवसायाकडेही त्यांचा विशेष कल होता. एकदा पेमगिरीच्या सरपंचपदाच्या संधीचाही त्यांनी त्याग केला व निष्ठा काय असते हे गावाला दाखवून दिली. गावातील नागरिकांची मनं त्यांनी नेहमीच जिंकली मात्र आजारपनाशी सुरु असलेली लढाई त्यांना जिंकता आली नाही ही सर्व पेमगिरीकरांसाठी धक्कादायक बाब होती. शेवटी जीवन म्हटलं कि मृत्यू असतोच मृत्यू हेच जीवनातील एकमेव सत्य आहे ते कुणीच नाकारू शकत नाही.

चांगदेव मामा आज जरी शरीराने आपल्यात नसतील तरी त्यांचे विचार, तत्व, प्रेरणा आजही जिवंत आहेत यात तिळमात्र शंका नाही. पुनर्जन्म आहे कि नाही हे मला माहिती नाही. पण पुनर्जन्म जर असेल तर चांगदेव मामांचा जन्म याच स्वराज्याच्या संकल्पभूमीत होवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. कै. चांगदेव एकनाथ गोडसे यांना प्रथम स्मृतीदीनानिमित्त विनम्र अभिवादन...!
बाळासाहेब भोर
पेमगिरी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या