रेल्वे प्रशासनाला जे जमले नाही ते प्रसाद शुगर च्या व्यवस्थापनाने प्रत्यक्षात करून दाखवले..!!

अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी-वांबोरी रोडवरील खडांबे खुर्द गावानजीक सडे रेल्वे चौकी गेट नंबर ३६ हे मागील तीन ते चार वर्षापासून रेल्वे प्रशासनाने बंद केलेले आहे. त्या ठिकाणी कोट्यावधी रुपये खर्च करून भुयारी मार्ग उभारलेला आहे. परंतु कोट्यावधी रूपये खर्च करून भुयारी मार्ग हा तांत्रिकदृष्ट्या अतिशय चुकीच्या पद्धतीने झालेला आहे.

रेल्वे पुलाखालून जातांना पुढच्या दिशेने आलेली गाडी ही या दिशेने जाणाऱ्या प्रवासाला अजिबात दिसत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की सदरचा भूयारी मार्ग हा अपघात प्रवण क्षेत्र आहे, असेही म्हणता येईल. जागेवर वळण असल्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून ये जा करावी लागते. सदर पुलाखाली अपघातांची मालिका नेहमीच सुरु असते.

तसेच पावसाळा ऋतु मध्ये अर्धा माणूस बुडेल इतके पाणी या पुलाखाली कायमस्वरूपी साचलेले असते आणि पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था ही अतिशय कुचकामी असून पूलाच्या लगत कल्हापूरे यांच्या शेतामध्ये एक विहीर खोदली आहे या पुलाखाली साचलेले पाणी सोडण्याच्या पद्धतीमध्ये जो तीन ते चार फुटाचा व्यास असलेला सिमेंट पाईप आहे त्यामध्ये साठ ते सत्तर टक्के गाळ साचत असल्याने पावसाळा ऋतू संपूनही एक ते दोन महिने झाले तरी देखील अद्याप पर्यंत रेल्वे प्रशासनाने गाळ काढण्याचे प्रयत्न किंवा पुलाखाली पाणी काढण्याची कोणतीही तरबेज केलेली नाही. म्हणून पुलाखालील पाणी आहे तसेच साचून राहिल्याने सदर पुलाखालून राहुरी-वांबोरी या मार्गाने प्रवास करणाऱ्यांची तसेच कृषी विद्यापीठातील कर्मचारी, प्रसाद शुगर कारखान्यातील कामगार, दुग्ध व्यवसायीक, शेतकरी, आणि व्यापारी वर्ग या मार्गावरच अवलंबून असतो. हा रस्ता अतिशय महत्वाचा असून वांबोरी ते राहुरी हे अंतर सर्वात कमी होते. अशी एकंदर परिस्थिती असूनही रेल्वे प्रशासनाने पाणी बाहेर काढण्याची कोणतेही ठोस उपाय योजना अद्याप पर्यंत केलेली नव्हती.

प्रसाद शुगर कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना झाला तरी देखील पुला खालील पाण्याच्या कारणास्तव परिपूर्ण आणि तोडणी योग्य असलेला शेतकऱ्यांचा ऊस हा कारखाना हाकेच्या अंतरावर असतांनाही वाहतूक करता येत नसल्याने शेतातच उभा होता म्हणून शकर्‍यांची मोठी कुचंबना झाली होती.

अशी एकंदर सर्व परिस्थिती असताना प्रसाद शुगर कारखान्याने सर्वांगीण विचार केला असता रेल्वे पुलाखाली पाणी काढण्याचा निर्धार केला आणि त्या अनुषंगाने राहुरी नगरपालिकेची अग्निशमन केंद्राची गाडी कारखाना व्यवस्थापनाने स्वखर्चाने बोलावली आणि दोन- तीन दिवसांत पुलाखालील पाण्याचा निचरा होणारी सिमेंटची पाईपलाईन ही अग्निशमन गाडीच्या प्रेशर च्या साह्याने संपूर्ण गाळा साफ करून पुलाखालील पाणी वाहून विहिरीत जाण्याकरिता मार्ग मोकळा झाल्याने आता पुलाखाली थेंबभर ही पाणी साचत नाही किंवा विहिरी मधून पुन्हा पाणी पुलामध्ये येत नाही.

प्रसाद शुगर कारखान्याच्या व्यवस्थापन आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनेप्रमाणे सदरचे काम यथायोग्य पार पडल्यामुळे परिसरातील सर्व प्रवाशांची तसेच शेतकरी, के.एस. बी. कंपनीचे कामगार, कृषी विद्यापीठ कामगार, विद्यार्थी, दूध व्यवसायक, आदिंची अडचण दूर झाल्यामुळे असे नक्की म्हणता येइल की "रेल्वे प्रशासनाला जे जमले नाही ते प्रसाद शुगर च्या व्यवस्थापनाने प्रत्यक्षात करून दाखवले" प्रसाद शुगर व्यवस्थापनाने केलेल्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या